Thursday, December 12, 2024
Homeराजकारणमहाराष्ट्रात भाजप महायुतीला फटका ? मविआला मिळणार कौल, सर्व्हेच्या आकडेवारीनं धक्का

महाराष्ट्रात भाजप महायुतीला फटका ? मविआला मिळणार कौल, सर्व्हेच्या आकडेवारीनं धक्का

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपा आणि काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये ३ राज्यात भाजपानं जबरदस्त यश पटकावलं. या विजयामुळे भाजपा नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळणार आणि पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयाची हॅट्रीक करेल असा दावा भाजपा नेते करत आहेत. तर दुसरीकडे २८ पक्षांच्या विरोधी इंडिया आघाडीनेही शड्डू ठोकत भाजपाचा पराभव होणारच असं म्हणत आहे. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी की एनडीए यात कोण बाजी मारेल हा मोठा प्रश्न आहे. यात एबीपी या हिंदी वृत्तवाहिनीनं सी वोटरच्या माध्यमातून जनतेच्या मनातील कौल घेण्याचा प्रयत्न केला आहे. जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर त्यात कोणाचा विजय होईल आणि कुणाच्या पदरी निराशा येईल यावर देशातील ५ राज्यातील आकडे हैराण करणारे आहेत. या ५ राज्यात पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश यात एकूण २२३ लोकसभा जागा आहेत. या जागांवरून देशातील सत्ता कोणाच्या हाती जाईल हे निश्चित होते. 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. इथं काँग्रेस-उबाठा-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचा पगडा भारी असल्याचं दिसून येते. जर महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्व्हेनुसार, इथं महायुतीला १९-२१ जागा तर महाविकास आघाडीला २६-२८ जागा आणि इतरांना ०-२ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मतांच्या टक्केवारीत महायुतीला ३७ टक्के, काँग्रेसला ४१ टक्के आणि अन्य २२ टक्के मते मिळतील असं बोलले जात आहे. 

२०१९ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाल्याचं दिसून आले. त्यात सुरुवातीला मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेना युती मोडली आणि राज्यात पहिल्यांदाच कट्टर विरोधी पक्ष असलेले शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी बनली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले. परंतु अवघ्या अडीच वर्षात शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदेंसह ४० आमदार भाजपासोबत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.राज्यात पुन्हा भाजपा आघाडीचं सरकार आले. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली.

अजित पवारांसह ४३ आमदार सत्तेत महायुतीसोबत सहभागी झाले. त्यामुळे राज्यातील प्रमुख २ प्रादेशिक पक्षात पडलेल्या या फुटीमुळे राजकीय चित्रच पालटले. अशातच आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असणार आहे. त्यात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सगळेच पक्ष तयारी करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होईल हे निकालानंतरच स्पष्ट होईल. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!