अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाकरीता महाविकास आघाडीचे जागावाटपचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला आहे. अँड प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश करुन त्यांच्यासाठी अकोला आणि शिर्डी हे दोन मतदारसंघ संघ सोडण्यात येणार आहे.आज दिल्लीत झालेल्या बैठकीत मविआचा अंतिम फॉर्म्युला ठरला असून लवकरच शिक्कामोर्तबाची असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यात दिल्लीत नुकतीच महत्त्वाची बैठक झाली होती. विशेष म्हणजे या बैठकीत वंचित आघाडी, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष,आमदार हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी यांना देखील महाविकास आघाडीत घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जागा वाटपात एकमत करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत ठरलेल्या फार्म्युल्यानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 18-19 जागा, काँग्रेस 13 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 10 जागा, वंचित आघाडी 2 जागा, स्वाभिमानी शेतकरी पक्ष 2 जागा, बहुजन विकास आघाडी 1 जागा यावर एकमत झाले आहे. मात्र अजून चार जागांवर असलेल्या चर्चा अंतिम टप्यात असून लवकरच मविआचे अंतिम जागावाटप जाहीर करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईतून सहा लोकसभा जागांपैकी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या तीन जागा शिवसेना उबाठा लढणार असून उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन जागा काँग्रेस लढणार असून उत्तर पूर्व मुंबईची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडण्यात आली आहे. तर रायगड, संभाजी नगर या दोन जागा उबाठाला सोडण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेना उबाठा 18-19 जागा लढणार आहे.
दरम्यान, काँगसच्या 12 जागांपैकी उत्तर मुंबई, भिवंडी, पुणे,सोलापूर, लातूर,नांदेड,धुळे,नंदुरबार, नागपूर,रामटेक,चंद्रपूर, गडचिरोली, तर वंचितसाठी अकोला, शिर्डी आणि राजू शेट्टी यांना कोल्हापूर,हातकडंगले, तर बहुजन विकास आघाडी सामील झाल्यास त्यांना पालघरची जागा सोडण्यात येईल, यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.