Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedताटातून वरणाची वाटी गायब होणार? आवक घटल्याने तूरडाळीच्या किंमती वाढणार

ताटातून वरणाची वाटी गायब होणार? आवक घटल्याने तूरडाळीच्या किंमती वाढणार

तूरडाळीत खरिपात २५ टक्क्यांची तूट असतानाच आता रब्बी हंगामातही १० टक्के तूट आहे. त्यामुळे यंदा बाजारात तब्बल ६ लाख टन तूरडाळ कमी असल्याने उन्हाळ्यात डाळ विक्रमी महागण्याची शक्यता आहे.

भारत हा डाळींचे सर्वाधिक सेवन करणारा देश आहे. त्यात तूरडाळ अग्रस्थानी असते. दरवर्षी ४२ ते ४४ लाख टन तूरडाळीची देशाची मागणी असते. केंद्रीय सांख्यिकी संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशात ४२.२० लाख टन तूर उत्पादन घेण्यात आले होते. २०२२-२३ चे लक्ष्य ४५.५० लाख टन असताना प्रत्यक्षात फक्त ३३.१२ लक्ष टन इतकेच उत्पादन झाले. आता यंदा ४३ लाख टन उत्पादनाचे लक्ष्य निश्चित आहे. त्यापैकी बहुतांश पीक हे खरिपात घेतले जाते. त्यामध्ये यंदा तब्बल २५ टक्क्यांची तूट होती. त्यानंतर आता रब्बी हंगामातही तूट आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, यंदा रब्बी हंगामात तुरीचे क्षेत्र कमी झाले आहे. भारतात तूरडाळीचे हेक्टरी उत्पादन ८८० किलो इतके आहे. तुरीपासून सर्वोत्तम डाळ ही साधारण ३० टक्के, मध्यम दर्जाची ३० टक्के तर निम्न दर्जाची २० ते ३० टक्के असते. जवळपास १८ ते २० टक्के तूर ही डाळ प्रक्रियेत वाया जाते. त्यानुसार किमान ५ ते साडेपाच लाख टनाची तूट रब्बी हंगामात आहे. खरिपाची तूट जवळपास ९ लाख टन होती.तूरडाळींचे खरिपातील उत्पादन नोव्हेंबरमध्ये बाजारात आले. रब्बीमधील उत्पादन मार्चमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र, तुटीच्या स्थितीमुळे बाजारात आत्ताच दर वाढू लागले आहेत.

तूरडाळीची तूट पाहता केंद्र सरकारने ८ ते १० लाख टन डाळ आयातीची तयारी केली होती. परंतु, रब्बी हंगामात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असल्याने त्यांनी आयात रोखली होती. आता रब्बीमध्येही तुटीची चिन्हे असल्याने तातडीने आयात सुरू करणे अत्यावश्यक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!