Saturday, July 27, 2024
Homeसंपादकियपंतप्रधान मोदी आणि भारत रत्न 'पुरस्कार' निमित्ताने......

पंतप्रधान मोदी आणि भारत रत्न ‘पुरस्कार’ निमित्ताने……

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : देशभरात अयोध्येतील नवनिर्मित मंदिरात श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापुर्वी आणि सोहळ्यानंतर रामभक्ती आपल्या चरमसिगेवर असताना, बिहारचे कर्पुरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ जाहीर करणे हा आणखी एक ‘मास्टरस्ट्रोक’ आहे असे ‘नमो’ म्हणणाऱ्यांस वाटत असेल तर, तर तो त्यांचा विचार स्वातंत्र्याचा अधिकार आहे. असो !
देशभरात सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर कर्पुरी ठाकूर यांचे कार्य निश्चितच निर्विवाद आहे. तथापि अयोध्येतील राम मंदिर व मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पार पडल्याच्या अवघ्या काही तासांतच ठाकूर यांना ‘भारतरत्न’ जाहीर झाल्याने यानिमित्ताने सध्याच्या राजकारणाचा वेध घेणे उद्बोधक आणि तेवढेच मनोरंजक होईल.

आगामी निवडणुकांत बिहारच्या नितीशकुमार यांच्या जनता दलाची साथ नसणे, लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाने नितीशकुमार यांची संगत करणे आणि एकूणच वातावरणात ईतर मागास वर्गीयांच्या जनगणनेची मागणी पुढे येणे. या सगळ्याचा विचार करुन ठाकूर यांची निवड ‘भारतरत्न’ साठी करण्यामागे हे कारण नाही, असे म्हणता येणे जरा अवघडच. सत्ताकारणात या मुद्द्यावर आतापर्यंत जे काही घडले, त्यापेक्षा वेगळे काही विद्यमान सत्ताधाऱ्यांनी केले नाही, इतकाच या चर्चेचा अर्थ. तथापि या निमित्ताने राजीव गांधी यांनी १९८८ साली तमिळनाडूचे एमजी रामचंद्रन यांना दिलेल्या ‘भारतरत्न’ चेही यावेळी कौतुक करावयास नको का ! त्यावेळी एमजीआर यांना भारतरत्न दिले जाण्याची तुलना आज ज्याला नवनैतिकवादी असे म्हटले जाते, त्या वर्गाने त्यावेळी ‘राजकीय’ निर्णय अशी मल्लिनाथी केली होती. हे अनेकांच्या स्मरणात असेल.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने महाराष्ट्राकडे आशाळभूतपणे पाहात सचिन तेंडुलकरला भारतरत्न जाहीर केले होते. त्या निर्णयाची या आजच्या निर्णयाशी बरोबरी होऊ शकेल. किंवा २०१९ साली पश्चिम बंगाल गरजेचे असल्याने एकाच वर्षी प्रणब मुखर्जी आणि संगीतकार भूपेन हजारिका यांना भारतरत्नने गौरविण्याच्या निर्णयाचा दाखलाही या संदर्भात दिला गेल्यास ते अयोग्य ठरणार नाही. कॉंग्रेसकडून भरपूर पदरात पाडून घेणारे गुलाम नबी आझाद यांना पद्म् भुषण पुरस्कार देण्याचे औचित्य गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ‘पद्माविभूषण’ने गौरवण्याचा निर्णयही या मालिकेत बसू शकेल. या राजीव गांधीं, काँग्रेसच्या निर्णयामागे राजकीय विचार होता असे म्हणावयाचे असेल तर आता ठाकूर यांना भारतरत्न जाहीर करण्यामागे राजकीय फायदा घेण्याचा विचार नाही, असे म्हणता येणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पद्माविभूषणाने गौरवण्याचा निर्णयही असाच धक्कादायक. महाराष्ट्र भाजपच्या मते तर पवार हे मूर्तिमंत भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत. पवार यांचे राजकारण कायमच भाजपविरोधी राहिलेले आहे. तर कॉंग्रेस वा ईतर पक्षांच्या सत्ताकाळात पवारांना दुसऱ्या क्रमांकाच्या नागर उपाधीने गौरविण्यात आले असते, याबाबत शंकाच आहे. पण ते काम भाजपने केले. यापेक्षाही या राजकारणाचे अधिक बोलके उदाहरण म्हणजे मुलायमसिंह यादव यांस मरणोत्तर पद्माविभूषण उपाधीने सन्मानित केले जाण्याचे. वास्तविक मुलायमसिंह यांच्या हयातीतच भाजपने त्यांचे ‘मुल्ला’ असं विशेषण केले होते. ‘मुल्ला मुलायम’ हा भाजपचा अत्यंत तिटकाऱ्याचा शब्दप्रयोग होता. अयोध्येतील कारसेवकांवर गोळीबार करण्यापर्यंत मुलायमसिंह गेले. त्यामुळे ते, त्यांचा पक्ष आणि भाजप यांच्यात कायमच साप-मुंगुसाइतके सख्य होते. तरीही अशा व्यक्तीस मरणोत्तर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान देणे हे भाजप आणि हिंदुत्ववाद्यांना चक्रावून टाकणारे नाही का ?

विद्यमान सरकारने गौरविलेले प्रणव मुखर्जी, पवार, मुलायमसिंह कोणत्याही अंगाने हिंदुत्ववादी विचारधारेस जवळचे नाहीत. इतिहासात समाजवादी विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारशी भाजपने सत्तासोबत केली खरी. पण वैचारिकदृष्ट्या त्यांची विचारधारा भाजपच्या धर्मप्रेमी भूमिकेशी कोणत्याही अर्थी सुसंगत नाही. पण तरीही ही अशांच्या शिरावर पद्माविभूषण वा भारतरत्नचे मुकुट चढवले गेले. असे करण्यामागे जे आपले नाहीत त्यांना आपल्याकडे वळवणे हा विचार असेल तर ते खरोखरच कौतुकास्पद म्हणावे ?आताही कर्पुरी ठाकूर यांच्या ‘भारतरत्न’ने अनेकांना विशेषत: भाजप आणि हिंदुत्ववाद्यांच्या गोटाला बुचकळ्यात टाकले असून जे आपले आहेत, उदाहरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्या विचारधारेचे अनुयायी, ते आपल्याकडून अन्यत्र जाणार तरी कोठे ? असा दृढ विश्वास ठेवून, राजकीयदृष्ट्या भाजपला ‘बेगाने’ आपले जवळचे वाटत असावेत. पण ही उपेक्षा घरचे किती सहन करणार हा प्रश्नच?

एकमात्र खरं की, मुळचे भाजपवाले काय लढतील इतक्या प्राणपणाने हे सर्व भाजपवासी आपापल्या मूळ पक्षांशी दोन हात करताना दिसतात. आतापर्यंत अनेक पक्षांनी सत्तांतरे अनुभवली. त्यातून सरकारे पाडली गेली आणि नवीन घरोबाही तयार झाला. पण यजमानाची वहाणच यजमानास गार करण्यासाठी वापरली जाण्याचा हा प्रकार राजकारणास तसा नवाच म्हणायचा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!