आपल्या बोल्ड लूक्समुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे हीचे निधन झाले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी सरव्हायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग)मुळे तिचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. पूनमच्या निधनामुळे बऱ्याच लोकांना धक्का बसला आहे. पूनम पांडेच्या टीमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅंडलवरुन तिच्या निधनाबद्दल माहिती कळवली.
पूनम पांडेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत तिच्या टीमने तिच्या फॉलोअर्सना ही बातमी दिली. तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून अद्याप याविषयी पूनमच्या कुटुंबियांनी या बातमीची पुष्टी केलेली नाही. पूनम ही सरव्हायकल कॅन्सरच्या चौथ्या स्टेजला होती अन् नुकतंच तिला या आजाराबद्दल समजलं होतं.
पूनमच्या अकाऊंटवर तिच्या मॅनेजरने केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिण्यात आलं की, “ही सकाळ आपल्या सगळ्यांसाठी फार खडतर असणार आहे. तुम्हा सगळ्यांना ही बातमी देताना अतिशय दुःख होत आहे की आपल्या पुनमचे सरव्हायकल कॅन्सरमुळे निधन झाले आहे. या दुखवट्याच्या काळात कृपया तिच्या कुटुंबियांना व नातेवाईकांना यातून सावरण्यासाठी थोडा वेळ द्या.”
या पोस्टवर पूनमच्या चाहत्यांनी कॉमेंट करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे. २०१३ मध्ये पूनमने ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या या निधनामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीलाच धक्का बसला आहे. पूनम तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असायची. नुकतीच पूनमने कंगनाच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये हजेरी लावली होती, परंतु ती या शोमध्ये जिंकू शकली नाही.