Tuesday, June 25, 2024
Homeअपघातफटाका फॅक्टरीत स्फोट ! सहा लोकांचा मृत्यू ; ५० हून अधिक लोक...

फटाका फॅक्टरीत स्फोट ! सहा लोकांचा मृत्यू ; ५० हून अधिक लोक होरपळले

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मध्य प्रदेशातल्या हरदा जिल्ह्यातल्या एका फटाका फॅक्टरीला आग लागल्याने तिथे स्फोट झाला. या स्फोटात सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ५० हून अधिक लोक होरपळले आहेत. या सगळ्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या ठिकाणी साधारण २० ते २५ लोक अडकल्याची भीती आहे. ज्यामुळे मदत आणि बचावकार्यही सुरु करण्यात आलं आहे. या घटनेनंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आपात्कालीन बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री जातीने या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

ANI च्या वृत्तानुसार हरदा येथील बैरागढ फटाका कारखान्यात स्फोट झाला. या कारखान्यात काही लोक अडकले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी SDRF ची टीम पोहचली आहे. तसंच घटनास्थळी रुग्णवाहिकाही दाखल झाल्या आहेत. अनेक जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. आगीचे भलेमोठे लोळ आणि धुराचे प्रचंड लोट या ठिकाणी दिसत आहेत. तसंच लोक जिवाच्या आकांताने पळतानाही दिसत आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाचे लोक पोहचले असून ते आग नियंत्रणात आणण्यासाठीही प्रयत्न करत आहेत. कारण त्यानंतरच बचावकार्य करता येणार आहे. या फॅक्टरीत फटाके असल्याने आग वारंवार भडकते आहे.

हरदामध्ये झालेल्या या दुर्घटनेनंतर नर्मदापुरम आणि बैतूर या ठिकाणांहूनही एसडीआरएफचं पथक आणि मदतीचं साहित्य पाठवण्यात आलं आहे. तसंच नर्मदापुरम या ठिकाणाहून तीन रुग्णवाहिका आणि सहा अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. तसंच एसडीआरएफचे १९ जवानही पोहचले आहेत.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच जे लोक या घटनेत जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारांचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. जे लोक या घटनेत होरपळले आहेत त्यांना भोपाळ, इंदूर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!