Monday, July 22, 2024
Homeसंपादकियसत्य स्वीकारण्याचा 'प्रामाणिकपणा' आहे ? ‘उडदामाजी काळेगोरे’ हेच काय ते सत्य

सत्य स्वीकारण्याचा ‘प्रामाणिकपणा’ आहे ? ‘उडदामाजी काळेगोरे’ हेच काय ते सत्य

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून शंभरभर किलोमीटर पेक्षाही कमी अंतरावर असलेले संदेशखाली हे मागास ठिकाण. त्या परिसरात तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने अनेक मजूर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची बरोबरी मणिपूरशी करण्याचा अतिउत्साही भाजप खासदारांचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडला असला तरी आरोपीवरील कारवाईसाठी त्यामुळे तेथे आंदोलन झाले. स्थानिक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी हा मुद्दा लावून धरला. भाजपने यात विशेष लक्ष घातले. याचे साधे आणि अर्थातच महत्त्वाचे कारण म्हणजे संदेशखाली कथित अत्याचार प्रकरणातील आरोपी. त्याचे नाव शाजहान शेख.

काही अपवाद वगळता आपल्याकडे स्थानिक राजकीय दांडगेश्वरांची हुकूमत असते. पक्ष कोणताही असो. पश्चिम बंगालात डावे जेव्हा सत्तेवर होते तेव्हाही अशा स्थानिक दांडगेश्वरांची संख्या मुबलक होती आणि डावे जाऊन तृणमूलची सत्ता आली तरी त्यांची संख्या कमी झालेली नाही. हा शाजहान शेख या अशांतीलच एक असून सत्ताधीशांचे त्यास अभय होते. असा विरोधकांचा आरोप आहे. त्यावरून गेले काही दिवस भाजप आणि तृणमूल पुन्हा एकदा हमरीतुमरीवर आले असून जे घडते आहे त्यावरून एक विदारक चित्र निर्माण होते.येणार नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकांत अल्पसंख्याकांनी तृणमूलला मोठा आधार दिल्याने अल्पसंख्याकास तृणमूलपासून तोडण्यासाठी या घटनेचा उपयोग करण्याचा विचार भाजप नेतृत्वाच्या मनात आला असेल तर, ते प्रचलित राजकीय संस्कृतीनुसारच झाले असे म्हणता येईल. कारण साध्यसाधनविवेक वा नैतिकता इत्यादी मुद्दे भाजपने या शेखाविरोधात रान उठवण्यामागे आहेत, असे मुळीच नाही. जर असे असते तर तृणमूलातील भ्रष्टाचारी हिंदूंना भाजपने स्वत:च्या पदराखाली घेऊन पवित्र केले नसते. पण सदर प्रकरणातील आरोपी शेख असल्याने भाजप त्यास जवळ करणे शक्य नाही आणि या अल्पसंख्याकांची तृणमूलशी असलेली जवळीक सहन करणेही भाजपला अशक्य आहे. तेव्हा हे प्रकरण गाजणार, गाजवले जाणार हे ओघाने आलेच.

पश्चिम बंगालात प्रभाव विस्तारासाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपच्या हाती तृणमूलने हे आयते कोलीत दिले आणि भाजपने त्याचा पुरेपूर वापर केला. त्यात भाजपला दोष देता येणार नाही. सदर प्रकरणी अधिक सजगता दाखवायला हवी होती ती सत्ताधारी तृणमूलने. कारण विरोधी पक्षीयांची सत्ता असलेल्या राज्यात पराचा कावळा करण्यासाठी भाजप किती टपलेला असतो आणि त्यात भाजप-नियुक्त राज्यपाल किती उत्साही साथ देतात याचे असंख्य दाखले देता येतील. असे असताना भाजपला संधी मिळणार नाही, याची खबरदारी घेणे हे तृणमूल पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे कर्तव्य होते. ते त्यांनी निभावले नाही. तेव्हा भाजपवर या प्रकरणी राजकारण करत असल्याच्या ममताबाईंच्या आरोपात तथ्य कमी, कांगावा अधिक आहे. विरोधी पक्ष म्हणून भाजप हे करणारच. त्यांना तसे करण्याची संधी न देण्यात खरे शहाणपण आहे. मात्र त्याच्या अभावाचे प्रदर्शन ममताबाई सातत्याने करतात.

भाजप अनेक अंगांनी लढतो. याआधी महुआ मैत्रा प्रकरणातही हे वास्तव दिसून आले. त्याच प्रकारे इथेही भाजपच्या संसदीय शाखेने आपल्या विशेषाधिकाराचा भंग झाल्याचे कारण पुढे करीत या प्रकरणातील चौकशी वेगळ्याच पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. भाजप नेत्यांनी थातूरमातूर कारण पुढे करत भाजप खासदारांनी केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे चौकशी करवण्याचा घाट घातला. सर्वोच्च न्यायालयाने हा डाव उधळला. मात्र या प्रकरणातील आरोपी शेख जोपर्यंत जेरबंद होत नाही तोपर्यंत भाजप हा विषय तापवणार.

संदेशखाली येथील अभागी महिलांची काही दयामाया भाजपस येते, त्यांच्याविषयी काही सहानुभूती आहे असा विचार करण्याची अजिबात गरज नाही. इतकी अंधभक्ती केवळ भक्तांनाच शोभेल. कारण महिला अत्याचार, सार्वजनिक जीवनात महिलांचा आदर वगैरे मूल्ये भाजपकडून पाळली जात असती तर मणिपुरी महिलांच्या अब्रूचे धिंडवडे जगाच्या चव्हाट्यावर मांडले गेले नसते. मणिपुरातील महिलांना अद्याप न्याय मिळालेला नाही; हे सत्यच. भाजपसाठी स्त्रीदाक्षिण्य, महिलांचा ‘सम्मान’ इत्यादी मूल्ये खरोखरच महत्त्वाची असती तर त्या ब्रिजभूषणाचे काय हा प्रश्न समोर येतो. कुस्ती खेळात देशाचे नाव उजळ करणाऱ्या महिला कुस्तीपटूंवर या ब्रिजभूषणाने केलेल्या अत्याचारांची दखल भाजपने किती त्वरेने घेतली हे सर्व देशाने पाहिले. तेव्हा तृणमूल काय किंवा भाजप काय ! ‘उडदामाजी काळेगोरे’ हेच काय ते सत्य.

हा पक्ष चांगला की तो वाईट हा मुद्दाच नाही. तर सध्याच्या राजकारणाची स्पर्धा हाच तो महत्त्वाचा मुद्दा आहे. ही स्पर्धा ‘तुम्ही वाईट, आम्ही चांगले’ अशी अजिबात नाही. तर ‘आम्ही वाईट असू तर तुम्हीही चांगले नाही’  हे दाखवून देण्याची आहे. आमच्याकडे ब्रिजभूषण आहे तर तुमच्याकडे शाजहान शेख. आमचे मणिपूर तर तुमचे संदेशखालीही मणिपूरच आहे असा हा सगळा प्रकार. इतके दिवस ही ‘व्हाॅटअबाऊटरी’ परिघावरच्या समाजमाध्यामांतील फुकट्या फॉरवर्डींपुरतीच मर्यादित होती. परंतु आज ही ‘व्हाॅटअबाऊटरी’ राजकारणाच्या मध्यवर्ती युक्तिवादाचा भाग बनली. त्यामुळे हे सत्य स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा नैतिकवादी आणि नवनैतिकवादी यांच्यात आहे किंवा काय, हाच काय तो प्रश्न.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!