Saturday, July 27, 2024
Homeताज्या घडामोडीप्रकाश आंबेडकर मायावतींच्या मार्गाने जाणार नाहीत ! संजय राऊत उवाच

प्रकाश आंबेडकर मायावतींच्या मार्गाने जाणार नाहीत ! संजय राऊत उवाच

अकोला दिव्य न्युज ब्युरो : उत्तर प्रदेशात मायावतींचा मार्ग वेगळा आहे. कारण त्यांना अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायची आहे. तसेच आम्हाला विश्वास आहे की प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष मायावतींच्या मार्गाने जाणार नाही. कारण संविधान वाचवणं ही आमच्या इतकीच त्यांचीही जबाबदारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं संरक्षण करणं, मोदी-शहांच्या हुकूमशाहीचा पराभव करणं हे प्रकाश आंबेडकरांचंही कर्तव्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवला आहे. त्यांच्या काही वेगळ्या भूमिका ते जाहीरपणे मांडत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीने केलेल्या मागणीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना महाविकास आघाडीतले प्रमुख नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीचा घटक आहे. आम्हाला महाविकास आघाडीचा घटक करून घ्या, ही त्यांची मागणी आणि भूमिका होती. त्यानुसार त्यांच्या विनंतीस मान देऊन वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेतलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये सहभागी होतात, लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात होणाऱ्या चर्चेतही ते सहभागी होतात.

शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार म्हणाले, येत्या २७ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर आणि ‘वंचित’ला सन्मानाने त्या चर्चेसाठी पुन्हा एकदा आमंत्रित केलं आहे. त्यांनी या चर्चेला येण्याचं मान्य केलं आहे. तिथे जागावाटपाची चर्चा एकत्र होईल. परंतु, प्रकाश आंबेडकर यांची जी भूमिका आहे, तीन पक्षांनी आधी जागावाटप करावं आणि त्यांच्याकडून हव्या त्या जागा आम्ही मागून घेऊ, अशा प्रकारचं जागावाटप जगाच्या इतिहासात कधी झालेलं नाही आणि होत नाही. प्रकाश आंबेडकरांना राजकारण उत्तम कळतं, त्यांना भूमिकाही कळतात, त्यांना कोणत्या जागा हव्यात त्या आम्ही द्यायला तयार आहोत हे त्यांना माहिती आहे.

खासदार राऊत म्हणाले, या देशात संविधान वाचवण्याची लढाई चालू आहे, हे प्रकाश आंबेडकरांइतकं जास्त दुसऱ्या कोणाला माहिती नसेल. कारण ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आम्ही सगळे संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करतोय. त्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या हुकूशाहीचा पराभव करण्यासाठी या देशातले सर्व पक्ष एकत्र आले आहेत. ज्या पक्षांचे अंतर्गत मतभेद आहेत तेदेखील यानिमित्ताने एकत्र आले आहेत. सर्व राजकीय पक्ष काँग्रेससह फक्त या देशात संविधान राहावं, लोकशाही टिकावी यासाठी इंडिया आघाडीत सामील झाले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!