Saturday, July 27, 2024
Homeराजकारणमोठी बातमी! वसंत मोरेंचा राज ठाकरेंना अखेर जय महाराष्ट्र

मोठी बातमी! वसंत मोरेंचा राज ठाकरेंना अखेर जय महाराष्ट्र

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले बडे नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. वसंत मोरे यांनी फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला आणि त्यांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या फोटो समोर ते उभे आहेत, त्यांनी हात जोडले आहेत साहेब मला माफ करा असं वसंत मोरे म्हणत आहेत आणि त्यांनी आपण मनसे सोडल्याचं जाहीर केलं आहे. माझ्या नाराजीचा कडेलोट झाला त्यामुळे मी आता पक्ष सोडला आहे. माझ्याविरोधात सातत्याने काही गोष्टी पसरवल्या जात होत्या. तसंच त्या गोष्टींची शहानिशा न करता मला निष्ठा सिद्ध करावी लागत होती. मी फक्त अग्निपरीक्षाच देणं बाकी होतं असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात वसंत मोरे म्हणाले की, पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली १८ वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे असं त्यांनी सांगितले.त्यानंतर भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहका-यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती असं वसंत मोरे यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वसंत मोरे हे पुणे लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. सातत्याने त्याबाबत हे जाहीरपणे इच्छुक असल्याचे बोलत होते. परंतु पुणे मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांनीही आपण पुण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. यातच याआधीही वसंत मोरे यांनी पक्षातील स्थानिक नेत्यांकडून जाणुनबुजून डावललं जात आहे. कुठल्याही बैठकीला आमंत्रित केले जात नाही असं म्हटलं होते. त्यामुळे वसंत मोरे आणि त्यांची नाराजी पुण्यात चर्चेचा विषय बनली होती. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!