Saturday, July 27, 2024
Homeसलामीलाव रे तो व्हिडिओ ! भाजपच्या सत्ताकारणात ठाकरेंचा पर्याय ठाकरे होऊ...

लाव रे तो व्हिडिओ ! भाजपच्या सत्ताकारणात ठाकरेंचा पर्याय ठाकरे होऊ शकतो !

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटूनही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांना ‘धनुष्यबाण’सह मिळालेली (की, मिळवून दिलेली) शिवसेना अजूनही उद्धव ठाकरेंना पर्याय आणि मराठी मतांचे लक्षणीय विभाजन करण्यास सक्षम नसल्याची पुरेपूर खातरजमा झाल्यावर, यासाठी कोण ? तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सशक्त पर्याय दिल्या जाऊ शकते, ही जाणीव आल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ‘राज’ गरजेचे असल्याचे स्पष्ट दिसते. त्याचवेळी आपल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी राज यांनाही भाजपची गरज होती. त्यातून भाजप-मनसे युतीचा परस्पर सामंजस्य करार करण्याचे पक्के झाले.परंतु ‘राज’ पहिल्यांदाच राजकीय युती करत असल्याने ते युतीधर्म पाळण्यात यशस्वी होतील, हे येत्या काळात दिसून येईलच.

दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले, मुख्यमंत्री झाले. मात्र, ठाकरे ब्रँड उद्धव यांच्याकडेच राहिला. या ब्रँडला धक्का द्यायचा तर शिंदेंची साथ पुरेशी नाही, तर एक ठाकरेही लागणार हे भाजपच्या लक्षात आले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मते खेचता येतील, प्रचारात उद्धव यांना उत्तर देण्यासाठी राज यांच्या शैलीचा राजकीय फायदा करुन घेण्यासाठी राज यांच्यासमोर मैत्रीचा हात केला,असे मानले जाते.

शिंदेंच्या सेनेला न दुखावता ‘ठाकरे’ नावाचं राजकीय लाभ पदरात पाडून घेताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ३६ पैकी केवळ २५ मतदारसंघांत निवडणूक लढवत जवळपास पाच लाखांच्यावर मते घेतली.नेमके यांचं मतांवर डोळे ठेवून हा निर्णय घेण्यात आला, यात दुमत नसावे.पण शिवसेनेचं उध्दव ठाकरेंच्या हाती नेतृत्व सोपविण्यात येताना, राज ठाकरेंवर खरोखरच अन्याय झाला, अशी त्यावेळी राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होताच मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. पुणे, नाशिक महापालिकेत सत्ता, १३ आमदार, ठाण्यासह इतर काही शहरांमध्ये अस्तित्व निर्माण केले. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेचे एकेकाळी वैभव होते. मात्र गेल्या आठ-दहा वर्षांत ते पुरतं ओसरले आहे.हे भाजपवालेही जाणून असले तरी ‘ठाकरे’ नाव मुंबई येथील दोन मतदारसंघातील भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी अपरिहार्य झाले आहेत.

वर्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतभाजपचे सर्वशक्तिमान नेते नरेंद्र मोदी यांच्यावर ‘लाव रे तो व्हिडिओ’ मधून टीकेची प्रचंड झोड उडवीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घालणाऱ्या राज ठाकरे यांची बदलेली भुमिका मतदारांना पटेल का, मुंबईतील मनसेचा मतदार भाजपने बदलेले उमेदवार आणि शिंदे यांच्या उमेदवाराना मत देणार की, माघारी जाऊन उध्दव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिला तर…! हा देखील कळीचा प्रश्न आहेच. कुठल्याही प्रकारे, कोणत्याही परिस्थितीत ‘सत्ता’ या राजकीय महत्त्वाकांक्षाने, vote Transfer हे गणित लक्षात घेऊनच मनसेचा हात धरलेल्या भाजपला तेवढी मते येत्या लोकसभा निवडणुकीत मिळणार का? व मिळाली तर कुणाच्या विजयात मोजली जाणार आणि ही मोजदाद करताना जर मोदींना श्रेय दिले (भाजपचा तो अजेंडाच आहे) तर राज ठाकरे ते सहन करणार काय ? हा चर्चेचा विषय आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!