Saturday, July 27, 2024
Homeराजकारणबच्चू कडूंचा भाजपयुतीविरोधात शड्डू ! लोकसभेला उमेदवार उभे करणार ?

बच्चू कडूंचा भाजपयुतीविरोधात शड्डू ! लोकसभेला उमेदवार उभे करणार ?

महायुतीचे घटक असूनही प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू हे सातत्‍याने सरकारच्‍या विरोधात भूमिका मांडत आहेत. त्यामुळे महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. प्रत्‍येक मतदारसंघात ‘मी खासदार’ हे अभियान राबवून ३०० ते ४०० उमेदवार उभे करणार असल्‍याची घोषणा बच्‍चू कडू यांनी केल्‍याने भाजपसहित निवडणूक आयोगाचीही चिंता वाढण्‍याची शक्‍यता आहे. दरम्यान, आता बच्चू कडू यांनी भाजपा आणि महायुतीविरोधात शड्डू ठोकला आहे.

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीने अमरावती येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी ही बैठक बोलावली आहे. याबाबत बच्चू कडू म्हणाले, आज अमरावतीची बैठक होईल. २९ मार्चला नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यांची बैठक होईल. ३० मार्च रोजी औरंगाबाद, बीड, जालन्याची बैठक होईल. याचदरम्यान, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात नियोजन करण्यासाठी बैठका होतील. दरम्यान, अमरावतीची बैठक सुरू होण्यापूर्वी बच्चू कडू यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली.

बैठका घेण्याचं कारण विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, आम्हाला राज्यभरातून आमच्या कार्यकर्त्यांचे फोन येत होते की, महायुतीत आपल्याला कुठल्याही प्रकारची विचारणा होत नाही, आपल्याला केवळ मतांपुरतं गृहित धरलं जात आहे. आपण त्याचा बदला घेतला पाहिजे. त्यासाठी आपण निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. एकंदरित अशा प्रकारची आमच्या कार्यकर्त्यांची मतं आहेत. प्रहारची राज्यात एवढी ताकद असूनही आम्हाला निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने वागवलं जात आहे ते चुकीचं आहे. अशा पद्धतीने आम्हाला वागवलं जात असेल, आमच्या कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळत नसेल तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ. काय निर्णय घ्यायचा, कसा घ्यायचा हे आम्ही आजच्या बैठकीत ठरवू. वेळ पडल्यास प्रत्येक मतदारसंघात आमचा उमेदवार उभा करू. शेतकरी, मजूर, गोरगरिब, वंचित आणि दलितांची मदत करणारा एखादा कणखर उमेदवार असेल तर आम्ही त्याच्या पाठिशी उभे राहू.

यावेळी बच्चू कडू यांना विचारण्यात आलं की, तुम्ही आता महायुतीविरोधात बंड करणार का? त्यावर बच्चू कडू म्हणाले, आमची त्यांना सहाय्य करण्याची तयारी होती. परंतु, एकंदरित असं दिसतंय की, त्यांनाच आम्ही त्यांच्याबरोबर नको आहोत. त्यांना आम्ही नको आहोत तर आम्ही त्यांना आमचा झटका दाखवू, वेळ पडल्यास दणका देऊ. आमचे कार्यकर्ते फोन करून सांगत आहेत की, त्यांना मतदारसंघात कुठलीही विचारणा होत नाही. मग आम्हाला तरी कुठे त्यांची गरज आहे. आम्ही कोणत्याही पक्षावर अवलंबून नाही. राज्यात आमची स्वतंत्र ताकद आहे. जी वेळ पडल्यास दाखवून देऊ. वेळ पडल्यास महायुतीतून बाहेर पडू, प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे करू. परंतु, अद्याप तशी वेळ आलेली नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!