Saturday, July 27, 2024
Homeताज्या घडामोडीसरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितली व्यथा !…साठी मला ट्रोल केलं जातं…

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितली व्यथा !…साठी मला ट्रोल केलं जातं…

अकोला दिव्य न्युज ब्युरो : ऑनलाईन जगतात सोशल मीडियावर ट्रोलिंग करणे, हा प्रकार आता नवीन राहिलेला नाही. राजकारणी, खेळाडू, सेलिब्रिटी किंवा कुणीही मोठा व्यक्ती ट्रोलिंगला बळी पडतो. हे ट्रोलिंग कोणत्याही कारणावरून असू शकतं. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनाही ट्रोलिंगला बळी पडावं लागलं आहे. बंगळुरू येथे न्यायिक अधिकाऱ्यांच्या २१ व्या द्वीवार्षिक राज्य स्तरीय परिषदेत बोलत असताना चंद्रचूड यांनी प्रसंगातून व्यथा मांडली. याच परिषदेत त्यांनी काम आणि वैयक्तिक आयुष्याची सांगत घालत असताना तणावाचे व्यवस्थापन कसे करावे? याबाबतही मत व्यक्त केले.

फक्त खुर्चीवर सावरून बसलो म्हणून…
चंद्रचूड म्हणाले की, न्यायाधीशांच्या आणि विशेष करून जिल्हा न्यायाधीशांच्या कामात तणावाचे व्यवस्थापन करणे ही एक महत्त्वाची बाब आहे. हे सांगत असताना त्यांनी स्वतः बरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला. एका महत्त्वाच्या सुनावणीचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू होते, त्यावरून मला ट्रोल करण्यात आले. चार-पाच दिवसांपूर्वीचाच हा प्रसंग आहे. सुनावणीसाठी खंडपीठ बसले होते. माझी कंबर थोडी भरून आल्यामुळे मी थोडा सावरून बसलो. माझ्या खुर्चीवर माझ्या बसण्याची स्थिती बदलली. एवढ्याश्या कारणावरून मला ट्रोल केलं गेलं, अशी माहिती चंद्रचूड यांनी दिली.

चंद्रचूड पुढे म्हणाले की, या प्रसंगानंतर सोशल मीडियावर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या. सरन्यायाधीश यांचं वागणं अहंकारी असल्याचं काहीजण म्हणाले. सुनावणी सुरू असताना मी उठू किंवा माझ्या बसण्याची स्थिती बदलू कसा शकतो? असा आक्षेप ट्रोलर्सनी घेतला.

सामान्य माणसाच्या विश्वासाला पात्र ठरू
“ट्रोलर्स हे कधीच सांगणार नाहीत की, मी फक्त बसल्या जागी माझी कूस बदलली. सुनावणी सुरू असताना मी उठून गेलो, असे चित्र निर्माण केले गेले. २४ वर्ष मी न्यायनिवाडा करत आहे. आजवर कधीही मी न्यायालयाचे कामकाज सोडून बाहेर पडलेलो नाही. मी फक्त बसल्याजागी कूस बदलली तर मला ट्रोल केलं जातंय, असभ्य भाषेचा वापर केला जातो. पण मला विश्वास आहे की, आम्ही (न्यायाधीश) जे काम करत आहोत, त्यावर सामान्य माणसांचा विश्वास आहे. त्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचे काम आपल्याला करत राहायचे आहे, असेही डीवाय चंद्रचूड म्हणाले.

न्यायिक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, न्यायालयात बोलत असताना कधी-कधी वकील आणि वादी आपल्या मर्यादांचे उल्लंघन करतात. अशावेळी न्यायालयाची अवहेलना न समजता त्यांनी मर्यादेचे उल्लंघन का केले? हे मोठ्या मनानं समजून घ्यायला हवं. काम आणि वैयक्तिक जीवनात संतुलन निर्माण करणं हे न्यायदानाच्या कामाशीच निगडित आहे. इतरांना सुधारण्याऐवजी आपण स्वतःला आणखी कसे सुधारू शकतो, यावर लक्ष दिलं गेलं पाहीजे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!