Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीआंबेडकरांचा राऊतांवर गंभीर आरोप ! पाठीत खंजीर खुपसला; बैठकीत तर तुम्ही…

आंबेडकरांचा राऊतांवर गंभीर आरोप ! पाठीत खंजीर खुपसला; बैठकीत तर तुम्ही…

अकोला दिव्य न्युज ब्युरो : ( Marathi News ) : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल आपण महाविकास आघाडीत सहभागी न होता स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणार असल्याची घोषणा करत आपले नऊ उमेदवारही जाहीर केले. वंचितकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली असली तरी मविआचे नेते अजूनही सकारात्मक असून आंबेडकर यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र मविआ नेत्यांचाच आम्हाला सोबत घेण्याचा विचार नसल्याचा दावा वंचितकडून केला जात आहे. अशातच आता स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्स हँडलवकर एक खरमरीत पोस्ट लिहीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीत माझ्याविरोधात मविआने उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव संजय राऊत यांनी ठेवल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, “संजय तुम्ही किती खोटं बोलणार आहात? मुंबईतील फोर सीजन्स हॉटेल इथं ६ मार्च रोजी झालेल्या बैठकीनंतर इतर कोणत्याही बैठकीला तुम्ही आमच्या प्रतिनिधीला आमंत्रित का केलं नाही? आताही तुम्ही वंचितला आमंत्रित न करता का बैठका घेत आहात? तुम्ही तर सहकारी असूनही पाठीत खंजीर खुपसला आहे,” असा घणाघात आंबेडकर यांच्याकडून करण्यात आला आहे.

सिल्व्हर ओकवरील बैठकीत नेमकं काय घडलं?

शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथील बैठकीचा दाखला देत प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केला आहे. “सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली, हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही आमच्या विरोधात अकोला इथं उमेदवार देण्याचा प्रस्ताव ठेवला? हे कसलं नातं बनवू पाहात आहात आपण? एका बाजूला आघाडीचं आमिष दाखवायचं आणि दुसरीकडे आम्हाला पाडण्यासाठी कट रचायचा. असे विचार आहेत तुमचे?” असा खोचक सवाल आंबेडकर यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. 

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या आरोपांना आता संजय राऊतांकडूनही आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!