Saturday, October 5, 2024
Homeताज्या बातम्याअकोल्यात तिरंगी लढत ! दोन महिलांसह 15 उमेदवार निवडणूक रिंगणात !

अकोल्यात तिरंगी लढत ! दोन महिलांसह 15 उमेदवार निवडणूक रिंगणात !

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत कॉंग्रेस आणि अँड आंबेडकर यांच्यात काय तडजोड केली जाईल या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांचे लक्ष लागून होते. परंतु कोणत्याही प्रकारची तडजोड झाली नसल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात त्रिकोणी लढाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात दाखल 17 अर्जांपैकी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुक रिंगणात 2 महिलांसह 15 उमेदवार कायम आहेत.

अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूकीसाठी दाखल 17 अर्जांपैकी आज नारायण गव्हाणकर (अपक्ष) व गजानन साहेबराव दोड (अपक्ष) या दोघांनी अर्ज आज मागे घेतले. त्यामुळे आता 15 उमेदवार कायम आहेत. दुपारी चिन्हवाटपासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीला उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन, स्पेसिफाईड सहायक निवडणूक अधिकारी डॉ. शरद जावळे आदी उपस्थित होते.

बैठकीत सिलेंडर या चिन्हाची मागणी प्रकाश यशवंत आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), व शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लिग) या दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आल्याने ‘ड्रॉ’ काढण्यात आला. त्यात हे चिन्ह शेख नजीब शेख हबीब यांना मिळाले. प्रकाश यशवंत आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले.

उर्वरित उमेदवारांचे पक्ष व चिन्हे पुढीलप्रमाणे : अनुप संजय धोत्रे (भारतीय जनता पार्टी, कमळ), अभय काशिनाथ पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पंजा), काशिनाथ विश्वनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी, हत्ती), बबन महादेव सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी, टीव्ही), मुरलीधर पवार (अपक्ष, फलंदाज), मो. एजाज मो. ताहेर (अपक्ष, जहाज), धर्मेंद्र चंद्रप्रकाश कोठारी (अपक्ष, एअर कंडिशनर), अशोक किसन थोरात (अपक्ष, रोडरोलर), रत्नदीप सुभाषचंद्र गणोजे (अपक्ष, हिरा), ॲड. उज्ज्वला विनायक राऊत (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, ऊस घेतलेला शेतकरी). प्रीती प्रमोद सदांशिव (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सोशल, चिन्ह- गॅस शेग़डी), रविकांत रामकृष्ण अढाऊ (जय विदर्भ पार्टी, रूम कुलर), दिलीप शत्रुघ्न म्हैसने (अपक्ष, नारळाची बाग) आहेत.

चिन्हवाटपानंतर सर्व उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व नियम आदी माहिती व साहित्य देण्यात आले. यावेळी आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी आचारसंहितेशी संबंधित सर्व बाबींची माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उमेदवार खर्च व्यवस्थापन नोडल अधिकारी योगेश धोंगडे यांनी सादर करावयाचा लेखा विवरण, नोंदवही आदी माहिती दिली.

सामान्य निवडणूक अधिकारी रामप्रतापसिंग जाडोन यांनी उमेदवारांशी संवाद साधून निवडणूकीशी संबंधित कुठलीही बाब निदर्शनास आणून द्यावयाची झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यांचा संपर्क क्रमांक 8626058320 आणि दूरध्वनी क्रमांक (0724) 2991067 हा आहे. सामान्य निरीक्षक श्री. जाडोन यांना न‍िवडणूकीच्या अनुषंगाने कुणालाही भेटायचे किंवा माहिती द्यावयाची असल्यास ते शासकीय व‍िश्रामगृह येथील गुलमोहर कक्ष येथे सकाळी ९ ते १० या वेळेत भेटीसाठी उपलब्ध असतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!