Sunday, June 16, 2024
Homeराजकारणठाकरे गटाला मोठा धक्का ! सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटलांकडून अपक्ष अर्ज दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का ! सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटलांकडून अपक्ष अर्ज दाखल

सांगली मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेला असून विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी सातत्याने स्थानिक नेते आग्रह धरत होते. परंतु मविआत ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली असून याठिकाणी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी उफाळून आली आहे.

महाविकास आघाडी सांगलीबाबतचा निर्णय बदलेल अशी आशा स्थानिक नेत्यांना आहे. त्यासाठी नागपूर येथे काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. परंतु तत्पूर्वी विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. त्यात मंगळवारी काँग्रेस जिल्ह्यात मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन करणार आहे. यानंतर विशाल पाटील आणखी एक अर्ज भरतील जो काँग्रेसकडून असेल. काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळेल या आशेवरही नेते आहे. 

आज मोजक्या कार्यकर्त्यांसह विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. परंतु मंगळवारी सांगलीत शक्तिप्रदर्शन करत आणखी एक उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबाबत विशाल पाटील यांनी माहिती दिली की,  सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहे, तत्पूर्वी आज खरसुंडी येथे आमचे कुलदैवत सिद्धनाथाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सिद्धनाथाची कृपादृष्टी नेहमीच पाठीशी राहिली आहे. येणारा काळ कसोटीचा असला तरी सोबत संघर्षाचा वारसा आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाचे असणारे पाठबळ अगणित ऊर्जा देणारे आहे असं त्यांनी सांगितले.

भाजपाच्या माजी आमदारानं दिला पाठिंबा

विशाल पाटील यांनी आता अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केल्यानं जतचे भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्यामुळे खासदार संजयकाका पाटील यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार विलासराव जगताप यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीवरुन नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आज माजी आमदार विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!