Saturday, September 21, 2024
Homeसंपादकियअकोला 58.9 टक्के ! भाजपपुढे विधानसभानिहाय मताधिक्याचं आव्हान : 11नंतर वाढलेल्या मतदानाला...

अकोला 58.9 टक्के ! भाजपपुढे विधानसभानिहाय मताधिक्याचं आव्हान : 11नंतर वाढलेल्या मतदानाला वेगळे कंगोरे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची एकत्रित टक्केवारी 58.09 टक्के असून, 2019 मधील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 2 टक्के मतदान कमी झाले आहे.अकोला निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून काल रात्री 11 वाजता मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली. यासोबतच अकोला लोकसभा मतदारसंघासाठी 6 विधानसभा क्षेत्रनिहाय झालेल्या मतदानाचे अंतिम आकडे देण्यात आले आहेत. यामध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 50.10 टक्के, तर अकोला पूर्व 58.16 , आकोट 60.50, बाळापुर 61.69, मूर्तिजापुर 58.81 आणि रिसोड विधानसभा मतदारसंघात 60.1 टक्के मतदान झाले आहे.अकोला मतदारसंघाची टक्केवारी 2014 एवढीच म्हणजे 58 टक्के असून, 2 कमी झालेल्या मतदानाला अनेक कारणे असून यंदाची लढत काट्यावर काट्याची दुरंगी होऊन मताधिक्य अत्यंत कमी राहण्याची चिन्हे दिसत आहे.

अकोला मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 2014 एवढीच असली तरी त्यावेळी देशात कॉंग्रेस विरोधात प्रचंड रोष आणि मोदींचा करिष्मा चरमसिगेवर होता. तर 2019 च्या निवडणुकीवर ‘पुलवामा’ घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. पंतप्रधान मोदी यांनी ‘फस्ट टाईम वोटर्स’ना आपलं मत ‘शहीदांना अर्पित’ करा, असं आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला.मतांचा टक्का देखील वाढला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत मोदींकडे नवीन मुद्दा नसून, देशपातळीवर मतदारांमध्ये निरुत्साह जाणवतो. महाराष्ट्रातील राजकीय तमाशा आणि नेत्यांनी सोडलेल्या नैतिक पातळीने सामान्य माणसाच्या मनात चिड निर्माण झाल्यानेच, गडकरी सारख्यांचा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी देखील घसरली. दुसऱ्या टप्प्यातही टक्केवारी घसरणीवर असून यातून अकोला देखील सुटले नाही.

अकोला मतदारसंघात सलग दोन निवडणुकीत मुस्लिम उमेदवार दिल्यानंतर यंदा 2024 ला काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. गेल्या निवडणुकीत धार्मिक रंग चढल्याने भाजपला एकतर्फी यश मिळवले होते. आता दोन मराठा समाजाचे उमेदवार असून, महाविकास आघाडीतील ठाकरेगटासह सर्वांची एकजुटता आणि डॉ.पाटील यांचे संपूर्ण मतदारसंघात स्वतंत्र अस्तित्व, विकासाचा मुद्दा घेऊन मराठा मतांचे विभाजन टाळण्यासाठी, हिंदू मतदारांना कॉंग्रेसकडे वळविण्यासाठी केलेल्या व्युहरचनेने मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाल्याची मतदारांमध्ये चर्चा आहे, तर अकोला लोकसभा मतदारसंघात रिसोड विधानसभा वगळता 5 विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा आमदार नसताना सलग दोन लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराला ब-यापैकी मते मिळाल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात परंपरागत मतदार कायम आहेत, ही कॉंग्रेस उमेदवार डॉ पाटील यांची जमेची बाजू आहे. तर यंदा मोदींसाठी मतदान वगळता, मतदारांवर परिणाम करणारे नवीन मुद्द्यांचा अभाव, मतदारसंघात अंतर्गत हेवेदावे, काटशह, परिवारवादाचा असंतोष आणि मतदारांचा निरुत्साहसह 2 टक्के कमी झालेल्या मतदानाने भाजपच्या अडचणीत भर टाकली असून विधानसभा क्षेत्रनिहाय मताधिक्य कायम ठेवण्यास भाजप यशस्वी होणार काय, अशी शंकेची पाल चुकचुकली आहे.

लोकसभा 2014 च्या निवडणुकीत धोत्रे यांना 4 लाख 55 हजार 996 मते मिळाली होती.तर 2019 च्या निवडणुकीत यामध्ये एक लाखापेक्षाही अधिक वाढ होऊन धोत्रे यांना 5 लाख 54 हजार 444 एवढी मते मिळाली होती. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघांवर खासदार संजय धोत्रे यांनी विक्रमी मताधिक्य मिळवले होते. त्यामध्ये अकोट मतदारसंघात संजय धोत्रे यांना ९६ हजार ७०६, तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना ४४ हजार ४९५, ॲड. प्रकाश आंबेडकरांना ३९ हजार १७७ मते पडली. बाळापूरमध्ये तत्कालीन आमदार वंचितचे असताना देखील ॲड. आंबेडकरांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. धोत्रेंना ८० हजार ४८८, ॲड. आंबेडकरांना ५६ हजार ९८१ मते, तर पटेलांना ४८ हजार ०६१ मते मिळाली.अकोला पश्चिममध्ये धोत्रे ७८ हजार ७६९, पटेल ६३ हजार ६३८, ॲड. आंबेडकर २३ हजार ७४१ मते प्राप्त झाली होती. अकोला पूर्वमध्ये भाजपने मोठे मताधिक्य प्राप्त केले होते. त्यात धोत्रे यांना १ लाख ११ हजार ११५, दुसऱ्या क्रमांकाची मते ॲड. आंबेडकर यांना ६१ हजार ७१२, तर पटेल यांना केवळ २० हजार ८६७ मतांवर समाधान मानावे लागले. मूर्तिजापूरमध्ये धोत्रेंना ९० हजार ११५, पटेलांना ३७ हजार ४५०, तर ॲड. आंबेडकरांना ५२ हजार २३० मते मिळाली होती. रिसोड मतदारसंघात काँग्रेस आमदार असतानाही भाजपने दुपटीहून आघाडी घेतली होती. धोत्रे यांना ९० हजार ९०५, पटेल यांना ३९ हजार ५८३, तर ॲड. आंबेडकर यांनी ४४ हजार ४०० मते मिळाली होती. पश्चिम विदर्भातील राजकारण संजय धोत्रे एक मोठे प्रस्थ व नाव असून, गेल्या निवडणुकीतील सर्वच विधानसभानिहाय संजय धोत्रे यांना मिळालेले मताधिक्य कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान आहे.

चार महिन्यांतच समीकरणात बदलले समीकरणही…..

२०१९ मध्ये एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीनंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभेचे निवडणूक झाली होती. या चार महिन्यांच्या कालावधीतच मतांच्या समीकरणात मोठा बदल झाल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीत बाळापूरमध्ये तत्कालीन भाजप-सेना युतीचे उमेदवार नितीन देशमुख यांना ६९ हजार ३४३, अकोला पश्चिममध्ये भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांना ७३ हजार २६२, अकोला पूर्वमध्ये भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांना एक लाख ४७५, मूर्तिजापूरमध्ये भाजपचे हरीश पिंपळे यांना ५९ हजार ५२७, अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे यांना ४८ हजार ५४६, तर वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे अमित झनक यांना ६९ हजार ८७५ मते मिळाली होती. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेमध्ये सर्वच ठिकाणी भाजपच्या मतांमध्ये घसरण झाली होती. हे देखील समजून घेता येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!