अकोला दिव्य न्युज ब्युरो : विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्या सत्कारणी लागाव्या तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास वृद्धींगत व्हावा ह्या उद्देशाने बालरंगभुमी परिषद, अकोला यांच्या विद्यमाने प्रभात किड्स स्कूल, तोष्णीवाल ले-आऊट येथे दि. 7 मे ते 18 मे 2024 या कालावधीमध्ये 10 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ’छंद-आनंद’ या बालनाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अकोल्यातील ज्येष्ठ रंगकर्मी तसेच सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अरुण घाटोळे हे लाभले आहेत. या बालनाट्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रभात किड्स स्कूलच्या संचालिका वंदना नारे तसेच बालरंगभुमी परिषद, शाखा अकोलाचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी अशोक ढेरे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रथम नाव नोंदविणाऱ्या 20 विद्यार्थ्यांना या शिबिरात प्रवेश मिळाला आहे. बाल रंगभूमी परिषदेचे तर्फे अशाच विविध उपक्रमांचे भविष्यामध्ये आयोजन केले जाणार असल्याचे अशोक ढेरे यांनी या प्रसंगी सांगितले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रभातचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे, प्रमोद गोलडे व कर्मचारीवृंद परिश्रम घेत आहेत.