Saturday, July 27, 2024
Homeसंपादकियभाजप बहुमतपासून दूर ? मोदींचा टप्प्यागणिक भरकटलेला प्रचार आणि चार टप्प्यासाठी केजरीवालही...

भाजप बहुमतपासून दूर ? मोदींचा टप्प्यागणिक भरकटलेला प्रचार आणि चार टप्प्यासाठी केजरीवालही मैदानात

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : लोकसभेची निवडणूक आता उत्तरेकडे सरकू लागली असून टप्प्यागणिक भाजपच्या प्रचाराची दिशा बदलत आहे. प्रचाराच्या शुभारंभाचा ‘मोदी की गारंटी’ हा ब्रॉंड अवघ्या काही दिवसांनी दूर सारून, राम मंदिर व विकासाच्या मुद्द्यापासून फारकत घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरळ हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण, अनुसूचित जाती-जमाती व ओसीबी आरक्षण आणि आता तर चक्क अंबानी-अदानींचा कथित काळा पैसा, तो काळा पैसा पोते भरभरुन टेम्पोतून कॉंग्रेसला दिला गेला, शरदचंद्र पवार, उध्दव ठाकरे यांना भाजपप्रणित एनडीए मध्ये सहभागी होऊन सर्व स्वप्न पुर्ण करण्याचे आवाहन, असा कुठल्या कुठे प्रचार नेऊन ठेवला आहे.

भाजप पर्यायाने पंतप्रधान मोदी यांच्या प्रचाराची दिशा भरकटत चालली असताना राष्ट्रीय स्तरावर मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी व प्रियंका गांधी-वाड्रा, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि महाराष्ट्रात शरद पवार व उद्धव ठाकरे असे ‘इंडिया’तील प्रामुख्याने 7 नेते भाजप व मोदींना तगडे प्रत्युत्तर देत आहेत. परंतु या दरम्यान इंडिया आघाडीतील नेत्यांसह सर्वांना केजरीवाल यांची उणीव भासत असताना, अचूक वेळी मुरब्बी केजरीवालांची भर पडली आहे. प्रचाराच्या शुभारंभापासूनच पंतप्रधान मोदी यांना सुर गवसले नसताना, मुंबई शेयर बाजारातूनही भाजप बहुमताच्या आकड्यापासुन बरीच दूर असल्याचे सूर आवळला जात असताना, आज सुप्रीम कोर्टाने “दिड वर्षात फरक पडला नाही, तर 21 दिवसात काय होईल” असं निरीक्षण करून चाणाक्ष केजरीवाल यांना जामीन दिला असल्याने, भाजप, विशेषतः मोदी यांच्यावर अधिक मानसिक दबाव वाढला आहे, यात तिळमात्र शंका नाहीं.

अवघ्या काही दिवसांवर मतदान आले असताना अटक करून भाजपने केजरीवालांवर अन्याय केल्याची भावना लोकांमध्ये असून ‘आप’नेही मतदारांच्या मनात सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल देखील थेट मैदानात उतरून ‘आप’चे नेतृत्व करू लागल्याने भाजपला ‘आप’वर दबाव टाकण्यात फारसे यश आले नाही. तर जामिनावर सुटलेले संजय सिंह, आतिशी, सौरभ भारद्वाज आदी आपच्या नेत्यांनी भाजपकडून होणाऱ्या ‘तोफगोळ्या’नंतरही ‘आप’चा किल्ला कोसळू दिला नाही.केजरीवालांच्या सहकाऱ्यांनी ‘आप’ला खिंडार पाडण्याचे भाजपचे प्रयत्नही हाणून पाडले.

अखेरच्या चार टप्प्यात उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा या प्रमुख राज्यांपैकी प्रामुख्याने दिल्ली व पंजाबमध्ये ‘आप’ला मोठा फायदा होऊ शकतो. तर हरियाणामधील भाजप सरकार आधीच अडचणीत आले आहे. लोकसभेच्या किमान पाच जागांवर भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असताना हरियाणामध्ये केजरीवालांचा प्रभाव असल्याने त्यांचा काँग्रेसला लाभ मिळवता येऊ शकेल. उत्तर प्रदेशमध्ये ‘आप’ची ताकद नसली तरी ‘इंडिया’च्या वतीने केजरीवालांचे झंझावती दौरे होण्याची शक्यता आहे.टप्प्यागणिक केजरीवाल थेट प्रचारात सहभागी होणार असल्याने केजरीवालांसाठी भाजप म्हणजे एखाद्या सावजासारखे असेल.आज केजरीवालांना मिळालेला जामीन ‘इंडिया’साठी वरदान ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांच्या सहभागाने भाजप विरोधातील सर्व विरोधकांचा प्रचार अधिक धारधार व तितकाच रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर भाजप व पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात केजरीवाल यांच्या आक्रमकतेचा नवा अवतार पाहायला मिळू शकेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!