अकोला दिव्य न्युज ब्युरो : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. जवळपास सर्वच बोर्डांचे निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल सोमवारी लागणार आहे. २७ मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
बारावीच्या निकालानंतर राज्यातील दहावीच्या निकालाची सर्वंच विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकाल जाहीर केली आहे. सोमवारी २७ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना महामंडळाच्या वेबसाईटवरुन हा निकाल पाहता येणार आहे. दरम्यान, दहावीचा निकाल २७ मेच्या आधी लागेल, अशी माहितीसुद्धा शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी दिली होती. त्यानंतर महामंडळाने आता अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्य भरातून दहावीच्या १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामुळे आता सोमवारी लागणाऱ्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलं आहे.
कसा पाहाल निकाल?
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर दुपारी एक वाजल्यापासून पाहता येणार आहे. वेबसाईटवर गेल्या नंतर महाराष्ट्र SSC निकाल 2024 च्या लिंकवर क्लिक करा. तिथे रोल नंबर टाका आणि सबमिट करा. त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.