अकोला दिव्य न्युज ब्युरो : पातुर तालुक्यातील पिंपळकुटा येथील एका दैनिकाचे वार्ताहर राहुल देशमुख यांच्यावर रेती माफियांनी बातमीच्या संदर्भात जीवघेणा हल्ला करून त्यांना जीवाने मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यातून राहुल देशमुख बचावले असून ते उपचार घेत आहेत. या गंभीर घटनेचा जिल्हा पत्रकार संघाने तीव्र निषेध केला असून दोषींवर पत्रकार हल्ला अधिनियम अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जिल्हाभरात असामाजिकतत्त्वांकडून पत्रकारांना होत असलेल्या हल्ल्यात वाढ होत असून पोलीस प्रशासन या संदर्भात कोणत्याही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याघटने संदर्भात जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांची निवेदनासाठी वेळ मागून घेतली असताना पोलीस अधीक्षकांनी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना भेटण्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयात आलेल्या पत्रकार संघाच्या शिष्टमंडळास सांगण्यात आले.जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या असहकार्य बद्दल खेद व्यक्त केला.
अकोला पोलीस प्रशासनाने पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्या संदर्भात जागरूक होणे महत्त्वाचे असून पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याच्या संदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी व्यक्त केली. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार शौकत अली मिरसाहेब यांच्या पुढाकारात पत्रकार देशमुख यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे जेष्ठ उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार गजानन सोमाणी, सरचिटणीस प्रमोद लाजूरकर, विलास खंडारे, सतीश देशमुख, शरद शेगोकार समवेत जिल्हा पत्रकार संघाचे बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.