Saturday, December 14, 2024
Homeराजकारणनवीन खासदार कोण ? प्रशासन सज्‍ज : उद्या सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी

नवीन खासदार कोण ? प्रशासन सज्‍ज : उद्या सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी


Akola parliament member : अकोला दिव्य न्युज ब्युरो : तब्बल ३८ दिवसांपासून चर्चेत असलेला अकोला लोकसभा मतदारसंघाचा नवीन खासदार डॉ.अभय पाटील, अनुप धोत्रे आणि अँड आंबेडकर यांच्यापैकी कोण ? या प्रश्नाचे उत्तर उद्या मंगळवार ४ जुन रोजी जगजाहीर होणार आहे. सर्वांनी आपापल्यापरीने यावर मत नोंदवले आहे. मात्र अचूक उत्तरासाठी अकोला लोकसभा मतदारसंघासाठी पुढील पाच वर्षांकरीता नवीन खासदार निवडण्यासाठी जवळपास १२ लाख ५० हजार मतदारांनी २६ एप्रिलला केलेल्या मतदानाची मतमोजणी आवश्यक असल्याने उद्या मंगळवार ४ जुन रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरू होत आहे.

निवडणुकीची मतमोजणी औद्योगिक वसाहत परिसरातील महाराष्‍ट्र वखार महामंडळ येथे सकाळी 8 वाजतापासून सुरू होईल. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. येथील व्यवस्थेचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी आज घेतला. त्याचप्रमाणे, पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्म निरीक्षक यांचे प्रशिक्षण झाले. सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंह जाडोन तसेच प्रतुलचंद्र सिन्‍हा, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्यासह सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.


मतमोजणीबाबत…
मतमोजणीसाठी आवश्यक यंत्रणा, विविध सुविधा आदी तयारी करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्‍याकरीता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अकोला तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. अकोला मतदार संघाकरीता दुस-या टप्‍प्‍यामध्‍ये दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्‍यात आले आहे.
अकोला लोकसभा मतदार संघामध्‍ये 28-अकोट, 29-बाळापूर, 30-अकोला (पश्चिम), 31-अकोला (पूर्व), 32-मुर्तिजापूर (अ.जा.) व 33-रिसोड विधानसभा मतदार क्षेत्र समाविष्‍ट असून वरीलप्रमाणे मतदान झालेली मतदान यंत्रे ही महाराष्‍ट्र वखार महामंडळ, एमआयडीसी फेज-4, शिवणी, अकोला येथील मतदार क्षेत्रनिहाय तयार करण्‍यात आलेल्‍या सुरक्षा कक्षामध्‍ये त्रिस्‍तरीय सुरक्षा व्‍यवस्‍थेत सीलबंद करुन ठेवण्‍यात आलेली आहेत. मतमोजणी कक्ष हे निवडणूक‍ निर्णय अधिकारी, निवडणूक निरिक्षक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार/प्रतिनिधी व इतर अधिकारी/कर्मचारी यांचे समक्ष सकाळी 7.30 वाजता उघडण्‍यात येतील.

सदर मतमोजणी प्रक्रियेकरीता भारत निवडणूक आयोगाकडून 28-अकोट, 29-बाळापूर व 30-अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार क्षेत्राकरीता रामप्रतापसिंह जाडोन (भा.प्र.से.-2010) तसेच 31-अकोला (पूर्व), 32-मुर्तिजापूर (अ.जा.) व 33-रिसोड विधानसभा मतदार क्षेत्राकरीता प्रतुलचंद्र सिन्‍हा अशा दोन मतमोजणी निरिक्षक यांची नियुक्‍ती केली आहे.

    मतमोजणी प्रक्रीया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अकोला यांचे नियंत्रणाखाली तसेच खालीलप्रमाणे नियुक्‍त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे उपस्थितीत पार पडणार आहे.

मतमोजणी प्रकार मतदार क्षेत्र क्र.व नांव सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
1 टपाली मतपत्रिका मतमोजणी संपूर्ण उपजिल्‍हाधिकारी (रो.ह.यो.)
(समर्पित सहा.निवडणूक निर्णय अधिकारी)
2 EVMs व्‍दारे नोंदविलेल्‍या मतदानाची मतमोजणी 28-अकोट उपविभागीय अधिकारी अकोट
3 29-बाळापूर उपविभागीय अधिकारी बाळापूर
4 30-अकोला (पश्चिम) 30-अकोला (पश्चिम)
5 31-अकोला (पूर्व) 31-अकोला (पूर्व)
6 32-मुर्तिजापूर (अ.जा.) उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर
7 33-रिसोड उपविभागीय अधिकारी वाशिम

    मतमोजणीचे अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार टपाली मतपत्रिकांची मतमोजणी ही एकूण 16 टेबल वर करण्‍यात येणार आहे.
    सदर मतमोजणीसाठी प्रत्‍येक टेबलकरीता गट ब किंवा त्‍या वरील दर्जाच्‍या राजपत्रित अधिका-यांची अतिरिक्‍त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. 
    EVMs व्‍दारे नोंदविलेल्‍या मतांची मतमोजणी ही विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय प्रत्‍येकी 14 टेबल वर करण्‍यात येणार आहे. प्रत्‍येक विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय होणा-या मतमोजणीच्‍या फे-या खालीलप्रमाणे आहेत-

 मतदार क्षेत्र क्र.व नांव फे-यांची संख्‍या
1 28-अकोट 24
2 29-बाळापूर 25
3 30-अकोला (पश्चिम) 22
4 31-अकोला (पूर्व) 26
5 32-मुर्तिजापूर (अ.जा.) 28
6 33-रिसोड 24
    EVMs (CU) मधील मतमोजणी पुर्ण होताच भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरिक्षक, उमेदवार/प्रतिनिधी तसेच इतर अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थितीत विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय 5 मतदान केंद्रांची यादृच्‍छीक पध्‍दतीने (Randomly) चिठ्ठी व्‍दारे निवड करुन त्‍या मतदान केंद्रावर वापरलेल्‍या VVPAT मधील सर्व चिठ्ठयांची मोजणी करण्‍यात येणार आहे. त्‍याकरीता प्रत्‍येक विधानसभा मतदार क्षेत्राच्‍या मतमोजणी कक्षामध्‍ये 14 क्रमांकाचे टेबल निश्चित करण्‍यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडील सूचनेनुसार सदर टेबल सर्व बाजूने जाळीव्‍दारे बंदीस्‍त करण्‍यात आलेले आहेत तसेच त्‍याचे CCTV व्‍दारे चित्रीकरण करण्‍यात येणार आहे. 

    मतमोजणीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी-1, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी-6, समर्पित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (टपाली मतमोजणीसाठी)-1, अतिरिक्‍त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (टपाली मतमोजणीसाठी)-16 तसेच EVMs (CU) मतमोजणीकरीता राखीवसह एकूण मतमोजणी पर्यवेक्षक-132, मतमोजणी सहायक-132 व केंद्रशासकीय कार्यालयातील कर्मचारी हे सूक्ष्‍म निरिक्षक म्‍हणून-120 असे एकूण 407 अधिकारी/कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत.
    तसेच मतमोजणीच्‍या इतर अनुषंगीक विविध कामकाजाकरीता एकूण 734 अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.
    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 06-लोकसभा मतदार संघाकरीता निवडणूक लढविणा-या एकूण 15 उमेदवारांकडून नियुक्‍त मतमोजणी प्रतिनिधींची सद्यस्थितीत संख्‍या ही एकूण 508 इतकी आहे.
    मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण झाल्‍यानंतर मतदान यंत्रे तसेच त्‍यासंबंधीची संविधानिक कागदपत्रे हे भारत निवडणूक आयोगाकडून विहीत केलेल्‍या पाकीटांमध्‍ये तसेच सदर पाकीटे लोखंडी ट्रंक मध्‍ये सीलबंद करुन महाराष्‍ट्र राज्‍य वखार महामंडळ, एमआयडीसी फेज-4, शिवणी, अकोला येथील गोदाम  क्रमांक 7 मध्‍ये सीलबंद करुन ठेवण्‍यात येणार आहेत. 
    मतदान यंत्रे, पाकीटे व लोखंडी ट्रंक सीलबंद करणेकरीता विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांची पथके गठीत करण्‍यात आलेली आहेत.

कायदा व सुव्‍यवस्‍थेबाबतः
मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार मतमोजणीचे अनुषंगाने मतमोजणी केंद्रावर त्रीस्‍तरीय सुरक्षा व्‍यवस्‍था निश्चित करण्‍यात आलेली आहे. मतमोजणी केंद्राच्‍या 100 मिटर परिसराबाहेर जिल्‍हा पोलीस अधिक्षक, अकोला यांचेकडील पोलीस अधिकारी/कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. 100 मिटर परिसरामध्‍ये राज्‍य राखीव पोलीस दल तसेच मतमोजणी केंद्राभोवती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्‍यात आलेले आहे.
मतमोजणीचे दिवशी अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक-1, पोलीस उप अधिक्षक-1, पोलीस निरिक्षक-16 यांचेसह एकूण 568 पोलीस अधिकारी/कर्मचारी यांची बंदोबस्‍ताकरीता नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
 प्रसार माध्‍यम प्रतिनिधींकरीता सुविधाः
मतमोजणीचे अनुषंगाने मतमोजणी केंद्राचे ठिकाणी प्रसार माध्‍यमांचे प्रतिनिधी यांचेकरीता मतमोजणी केंद्राचे परिसरामध्‍ये प्रसार माध्‍यम कक्षाचे ठिकाणी बैठकीची व संपर्क साधनांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तेथे फेरिनिहाय निकाल दर्शविण्‍याकरीता व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे.
मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशांनुसार प्रसार माध्‍यमांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्राचे बाहेर प्रसार माध्‍यम कक्षामध्‍ये मोबाईल, कॅमेरा इ. त्‍यांची अत्‍यावश्‍यक उपकरणे/साहीत्‍य नेण्‍याची सवलत देण्‍यात आलेली आहे. परंतु कुठल्‍याही परिस्थितीत प्रसार माध्‍यमांचे प्रतिनिधी यांना मतमोजणी केंद्रातील व्हिडीओ चित्रीकरण / छायाचित्रण करण्‍याची तसेच मोबाईल व तत्‍सम साधने नेण्‍यास प्रतिबंध करण्‍यात आलेला आहे.

सी.सी.टी.व्‍ही. कॅमेरा निगराणीः
मतमोजणीचे अनुषंगाने सुरक्षा कक्षाचे आत व बाहेरील बाजूस तसेच संपुर्ण मतमोजणी प्रक्रियेवर व्हिडीओ कॅमेरा तसेच सी.सी.टी.व्‍ही. व्‍दारे निगराणी ठेवण्‍यात येणार आहे. त्‍याकरीता अद्यावत असे स्‍वतंत्र नियंत्रण कक्ष तयार करण्‍यात येत असून त्‍याठिकाणी पर्यवेक्षण करण्‍यासाठी अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.
 मदत कक्ष (Help Desk):
मतमोजणी करीता नियुक्‍त अधिकारी/कर्मचारी तसेच उमेदवार/मतमोजणी प्रतिनिधी यांची ओळख पटवून त्‍यांना मतमोजणी कक्षात जाण्‍यास परवानगी देण्‍याचे अनुषंगाने त्‍याचप्रमाणे मतमोजणी विषयक सहाय्यता करण्‍यासाठी मतमोजणी कक्षाचे 100 मिटर परिसराबाहेर मदत कक्ष स्‍थापन करण्‍यात आले असून त्‍याठिकाणी अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
 वाहनतळ व्‍यवस्‍था (Parking):
मतमोजणीचे ठिकाणी येणा-या अधिकारी/कर्मचारी तसेच उमेदवार/मतमोजणी प्रतिनिधी यांचेकरीता मतमोजणी केंद्राजवळच पार्कींग व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.
 भोजन / चहा / न्‍याहारी व्‍यवस्‍था :
मतमोजणीचे ठिकाणी कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचेकरीता भोजन / चहा / न्‍याहारीची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच उमेदवार/मतमोजणी प्रतिनिधी यांचेकरीता सशुल्‍क कुपन पध्‍दतीचा वापर करुन भोजन/चहा/न्‍याहारी व्‍यवस्‍था तसेच बैठक व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

 अग्‍नीशमन व्‍यवस्‍थाः अग्‍नीशमन विभागाचे जबाबदार अधिकारी/कर्मचारी अग्‍नीशमन वाहनासह मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहणार आहेत.

 वैद्यकीय सुविधाः मतमोजणी केंद्राचे ठिकाणी रुग्‍णवाहीका, आवश्‍यक ती औषधे, यंत्रसामुग्री तसेच तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे चमु सज्‍ज ठेवण्‍यात येणार आहे.

तसेच फेरिनिहाय निकाल व अंतिम निकालानुसार कल सार्वजनिकरीत्‍या प्रसारित करण्‍यासाठी लाऊडस्‍पीकरव्‍दारे माहिती देण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.
नियुक्‍त सर्व अधिकारी/कर्मचारी यांचेकरीता तिसरे व अंतिम मतमोजणी प्रशिक्षण दिनांक 3/6/2024 रोजी सकाळी 9 वाजता महाराष्‍ट्र राज्‍य वखार महामंडळ, एमआयडीसी, फेज-4, शिवणी, अकोला येथील मतमोजणी केंद्राचे ठिकाणी आयोजित करण्‍यात आलेले आहे.

    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे अनुषंगाने 06-अकोला लोकसभा मतदार संघाच्‍या मतमोजणीची संपुर्ण तयारी झाली असून मतमोजणीसाठी प्रशासन सज्‍ज झाले आहे.
    मतमोजणी केंद्राचे ठिकाणी येणा-या अधिकारी/कर्मचारी, उमेदवार/मतमोजणी प्रतिनिधी यांनी मोबाईल फोन सोबत आणू नये तसेच अकोला जिल्‍ह्यातील उन्‍हाची तीव्रता लक्षात घेता मतमोजणीचे ठिकाणी येणा-या नागरीकांनी उष्‍माघातापासून बचावाचे अनुषंगाने आवश्‍यक ती काळजी घ्‍यावी. त्‍याचप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्‍याकरीता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अकोला तथा निवडणूक निर्णय अधिकारी, 06-अकोला लोकसभा मतदार संघ यांचेकडून करण्‍यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!