Thursday, September 19, 2024
Homeराजकारणडॉ. अभय पाटील यांची टीका : ॲड. आंबेडकरांचे राजकारण काँग्रेस पाडण्यासाठीच !

डॉ. अभय पाटील यांची टीका : ॲड. आंबेडकरांचे राजकारण काँग्रेस पाडण्यासाठीच !

dr.abhay patil claim to ad.aambetkar : अकोला दिव्य न्युज ब्युरो : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात अनेक मतदारसंघात वेगवेगळी भूमिका घेतली. त्यांचे राजकारण आता जनतेने ओळखले आहे. त्यामुळेच यावेळेस त्यांच्या मतांमध्ये देखील घट झाली, अशी टीका अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी केली.

अकोला लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा कमळ फुलले आहे. भाजप व काँग्रेसमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी बाजी मारली. त्यांनी काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांचा ४० हजार ६२६ मतांनी पराभव केला. वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. अकोल्यात परंपरेनुसार यावेळेस देखील तिरंगी लढत झाली. अनुप धोत्रे यांना चार लाख ५७ हजार ०३० मते पडली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना चार लाख १६ हजार ४०४ मते मिळाली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख ७६ हजार ७४७ मतांवर समाधान मानावे लागले.

निवडणूक निकालानंतर डॉ. पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. अकोल्यात काँग्रेसला पाडण्यासाठी उभे राहायचे, नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेसला पाठिंबा द्यायचा, बारामतीत राष्ट्रवादीला पाठिंबा, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांना पाडायला मागे लागायचे. त्यांच्या या राजकारणाचा संदेश जनतेत गेला आहे. त्यामुळेच यावेळेस मतदान वाढल्यानंतर देखील त्यांना मतदान कमी पडले आहे, असा आरोप डॉ. पाटील यांनी केला. दरम्यान, काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस आणि वंचितमधील वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!