heavy-rain-accompanied-by-gale-force-in-akola-city-अकोला दिव्य न्युज ब्युरो : यंदाच्या मृग नक्षत्राच्या पुर्वसंध्येला आज गुरुवार ६ जुन रोजी अकोला शहर व परिसरात सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने लावलेल्या हजेरीने शहरात दाणादाण उडवली.
वाऱ्याचा जोर इतका प्रचंड होता की, अनेक भागातील वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे काही भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. काही होर्डिंग्ज तुटून पडले.
वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शहराच्या अनेक भागातील वीजेच्या तारा तुटल्याने उशिरा पर्यंत विजपुरवठा खंडीत होता. तोष्णीवाल ले-आऊटमध्ये एक विद्युत रोहीत्र (डीपी) जमीनदोस्त झाले. शहरालगतच्या परिसरात गारपीट झाली असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या वादळात सुदैवाने प्राणहानी झाली नाही.
प्रचंड गर्मीने त्रस्त झालेल्या अकोलेकरांना गुरुवारी सायंकाळी आलेल्या मान्सून पूर्व पावसाने दिलासा मिळाला आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कडक ऊन पडले असताना अचानक ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर साडेपाच वाजताच्या सुमारास सोसाटाच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि बघता बघता मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
अर्धा तास पेक्षा अधिक वेळ कोसळलेल्या पावसाने शहरात सर्वत्र दाणादाण उडवली. बाजारपेठेत हातगाडीवर किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांच्या वस्तू पावसाने भिजल्या. तर बाजारपेठेतील नाले व नाल्यातील साचून असलेली घाण सर्वत्र पसरली.
याशिवाय शहराच्या अनेक भागात झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूक बाधित झाली. शहराच्या काही भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी महावितरणाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.