Ajit Pawar group MLAs meeting : अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सुरू झालेल्या चलबिचलीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने गुरुवारी आमदारांची बैठक बोलाविली आहे. पक्षाचे काही आमदार शरद पवार गटात परण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला किती आमदार हजेरी लावतात याची उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाने केवळ चार जागा लढवल्या होत्या. पक्षाला रायगड ही एक जागा जिंकता आली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. महायुतीच्या घटक पक्षाची मते राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्राप्त झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. या सर्व बाबींची चर्चा आमदारांच्या बैठकीत करण्यात येणार आहे. लोकसभेचे मतदार संपल्यानंतर राष्ट्रवादी आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती.
विधानसभेत राष्ट्रवादीचे ५३ आमदार होते. त्यापैकी ४३ आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली. अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतण्याच्या वाटेवर आहेत, असे विधान शरद पवार गटाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.