Sunday, June 16, 2024
Homeक्रीडाआज 'महा-मुकाबला’ ! भारता सोबत पाकिस्तानचा सामना : ११ वर्षांपासून जेतेपदासाठी...

आज ‘महा-मुकाबला’ ! भारता सोबत पाकिस्तानचा सामना : ११ वर्षांपासून जेतेपदासाठी आतुर

ICC CWC , Ind Vs Pak : अकोला दिव्य न्युज ब्युरो : मागच्या ११ वर्षांपासून आयसीसी स्पर्धेच्या जेतेपदासाठी आतुर असलेला भारतीय संघ आयर्लंडवर मात करीत आत्मविश्वासाने सज्ज झाला असून अमेरिका संघाकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तान अडचणीत आला आहे. अशातच आज रविवारी भारताविरुद्ध न्यूयॉर्कमध्ये खेळल्या जाणाऱ्या ‘महामुकाबल्या’दरम्यान निश्चितपणे पाकिस्तानवर दडपण असेल ! आणखी एक पराभव झाल्यास त्यांचा सुपर एटचा प्रवास थांबू शकतो. तर भारताने बाजी मारल्यास अ गटात भारत आणि अमेरिकेचे ४-४ गुण होतील तर पाकचे गुणांचे खातेही उघडणार नाही.

पाकविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांची सकारात्मक वृत्ती निर्णायक ठरणार आहे. सर्वच जण आयपीएल खेळून अमेरिकेत दाखल झाले. आयपीएलमध्ये सर्वांनी चौकार- षटकारांची आतषबाजी केली. पण येथे परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ड्रॉप इन खेळपट्टीवर आयपीएल सारखी फटकेबाजी शक्य नाही. असे केले तर पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखे होईल. झटपट धावा काढण्याच्या नादात २० षटकांआधीच डाव संपुष्टात येऊ शकतो. आक्रमक खेळायचे आहेच. पण विकेटही शाबूत ठेवावी लागेल. ड्रॉप इन खेळपट्टीवर १७०-१८० धावा आव्हानात्मक ठरू शकतील. 

पाक पुनरागमनाचा प्रयत्न करणार
 कागदावर टीम इंडिया बलाढ्य वाटतो. मैदानातही भारत वरचढ जाणवतो. स्पर्धेत आव्हान टिकविण्यासाठी पाकिस्तान संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू शकतो. शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, मोहम्मद आमिर आणि नसीम शाह हे वेगवान गोलंदाज अमेरिकाविरुद्ध लौकिकानुसार कामगिरी करू शकले नाहीत. खेळपट्टीचा चौघेही लाभ घेण्याचा प्रयत्न करतील. भारतीय फलंदाजी लयीत आहेत. अशावेळी पाकच्या गोलंदाजांनी बेशिस्त मारा केल्यास भारतीय फलंदाज त्यांना सळो की पळो करून सोडतील. 

रोहित- विराट सलामीला 
कर्णधार रोहित सोबत विराट कोहली डावाची सुरुवात करणार आहेत. संघ व्यवस्थापनाने फलंदाजी क्रम निश्चित केला असून त्यात बदलाची शक्यता कमीच आहे. एखादा फलंदाज जखमी झाल्यास काहीअंशी बदल होऊ शकतील.  आयर्लंडविरुद्ध रोहितने अर्धशतकी खेळी केली तर विराट एक धाव काढून बाद झाला होता. पण विराटच्या क्षमतेवर शंका घेण्याचे कारण नाही. फॉर्ममध्ये असलेला यष्टिरक्षक- फलंदाज ऋषभ पंत तिसऱ्या स्थानावर खेळेल.

भारताला परिस्थितीवर नियंत्रण गरजेचे
नाणेफेक जिंकल्यास फलंदाजी घ्यावी की, गोलंदाजी हादेखील प्रश्न आहेच. टी-२० अनेक संघ लक्ष्याचा पाठलाग करणे पसंत करतात. लक्ष्य आणि खेळपट्टीचे पुरेसे आकलन तोपर्यंत झालेले असते. लक्ष्याचा पाठलाग करणे म्हणजे विजय निश्चित होणे, असे मुळीच नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास पराभव पदरी पडू शकतो. गोलंदाजीत प्रभावी कामगिरीच्या बळावर प्रतिस्पर्धी संघाला लवकर गुंडाळणे ही विजयाची पहिली पायरी ठरू शकेल. 

.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!