Sunday, June 16, 2024
Homeराजकारणएकनाथ खडसे यांची सुन रक्षा खडसेंची झेप : सरपंचपदापासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत

एकनाथ खडसे यांची सुन रक्षा खडसेंची झेप : सरपंचपदापासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत

पक्षाशी एकनिष्ठ आणि सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजयाची पताका फडकाविल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये रावेरच्या रक्षा खडसे यांना मंत्रिपदी संधी मिळाली आहे. कोथळीच्या सरपंच ते आता केंद्रातील मंत्री अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली आहे. सासरे एकनाथ खडसे यांनी मध्यंतरी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला तरीही रक्षा या भाजपबरोबर एकनिष्ठ राहिल्या. त्याचे फळ त्यांना आता मिळाले आहे.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिला आहे. संगणकशास्त्रातील पदवीधर आणि मराठी, हिंदी, गुजराथी, इंग्रजी या चार भाषांवर प्रभुत्व असलेल्या रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. रावेर मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपने रक्षा खडसे यांना सलग तिसर्‍यांदा संधी दिली. त्यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. रक्षा खडसे या २०१० पासून राजकारणात सक्रिय आहेत.

रक्षा खडसे यांचा जन्म १३ मे १९८७ रोजीचा झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाला. २०११ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनीष जैन यांनी निखिल खडसे यांचा पराभव केला. तेव्हापासून जैन आणि खडसे यांच्यात कट्टर वाद सुरू झाला. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच २०१३ मध्ये निखिल यांनी आत्महत्या केली. तेव्हापासून जैन आणि खडसे कुटुंबातील वाद विकोपाला गेला. रक्षा यांच्यासाठी ही मानसिक आघात करणारी घटना होती. परंतु, यातून त्या सावरल्या. पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक कार्यात झोकून दिले.

कोथळी गावच्या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, २०१४ मध्ये रावेर मतदारसंघातून खासदार, असा त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला. १६ व्या लोकसभेत वयाच्या २७ व्या वर्षी निवडून गेलेल्या रक्षा खडसे या सर्वांत तरुण खासदारांपैकी एक होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाने पुन्हा रक्षा यांच्यावर आणि मतदारांनी रक्षा यांच्यावर विश्वास ठेवला.

रक्षा खडसे यांच्या राजकीय वाटचालीत सासरे एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांनी रक्षा यांना राजकारणात पूर्ण स्वातंत्र्य दिले. सासरे मध्यंतरी विरोधी पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही दोघांच्या नातेसंबंधात कधी अंतर पडले नाही. उलट, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून रक्षा यांना उमेदवारी निश्चित होताच एकनाथ खडसे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत रक्षा यांच्या प्रचारात झोकून दिले. आता रक्षा या केंद्रात मंत्री झाल्याने एकनाथ खडसे यांचे राजकीय वजन पुन्हा वाढणार आहे. भाजपमधीलच त्यांचे कट्टर राजकीय विरोधक देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची मात्र त्यामुळे चांगलीच अडचण होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!