Friday, October 11, 2024
Homeराजकारणनरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ ! मुख्यमंत्रीपदापासून 23 वर्षांपासून आहेत...

नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ ! मुख्यमंत्रीपदापासून 23 वर्षांपासून आहेत सत्तेत

‌अकोला दिव्य न्युज ब्युरो : देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. बहुमत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (NDA) आहे. एनडीएचे आणि भाजपाचे संसदीय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमुखाने निवड झाली. त्यानंतर आज रविवार ९ जुन रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विविध देशांचे पंतप्रधान, प्रतिनिधी हे या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा तिसरा कार्यकाळ कसा असेल हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे. मात्र त्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि आतापर्यंत नरेंद्र मोदी किती काळ सत्तेत राहिले, हे जाणून घेऊ !

…..आणि नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाले
२००१ मध्ये गुजरातमध्ये भूकंप झाला. या भूकंपात राज्याचं अतोनात नुकसान झालं. जवळपास २० हजार लोक या भूकंपात मृत्युमुखी पडले. त्यानंतर मुख्यमंत्री असलेल्या केशुभाई पटेल यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं. ७ ऑक्टोबर २००१ या दिवशी कुठलीही निवडणूक न लढवणाऱ्या नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यानंतर अवघ्या पाच महिन्यांत गुजरातमध्ये गोध्रा दंगल झाली. फेब्रुवारी २००२ मध्ये झालेल्या या दंगलीत हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समुदायाचे बांधव मारले गेले. सोनिया गांधींनी त्यावेळी मोदींचं वर्णन ‘मौत के सौदागर’ असं केलं होतं. त्यावेळी देशाचे पंतप्रधान असलेल्या अटलबिहारी वाजपेयींनी मोदींना राजधर्माची आठवण करुन देत पद सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी वाजपेयींना स्पष्ट शब्दांत सांगितलं, ‘मोदी गया तो गुजरात गया’ त्यामुळे ते मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले.

गुजरातच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश
डिसेंबर २००२ मध्ये गुजरातमध्ये निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीत १८२ पैकी १२५ जागा जिंकत मोदी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २००७ आणि २०१२ या दोन वर्षांमध्ये झालेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपालाच घवघवीत यश मिळालं आणि मुख्यमंत्रिपदी नरेंद्र मोदी कायम राहिले. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी प्रदीर्घ काळ राहण्याचा रेकॉर्ड नरेंद्र मोदींच्याच नावे आहे. २०१३ मध्ये भाजपाने मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी प्रचार सुरु केला. २१ मे २०१४ या दिवशी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर आनंदीबेन पटेल या गुजरातच्या मुख्यमंत्री झाल्या. तर नरेंद्र मोदींनी देशाचे पंतप्रधान म्हणून सूत्रं सांभाळली. भाजपाला २०१४ च्या निवडणुकीत २८२ जागा मिळाल्या होत्या.

२०१९ मध्ये मोदींचा विजयरथ कायम
नरेंद्र मोदी आणि भाजपाचा विजयरथ २०१९ मध्येही कायम राहिला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा मिळाल्या. तर भाजपासह एनडीएला ३५० हून अधिक जागांवर यश मिळालं. २०१९ मध्ये नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले.

आता २०२४ मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होत आहेत. एवढा प्रदीर्घ काळ सत्तेत असलेले नरेंद्र मोदी हे एकमेव नेते ठरले आहेत. २००१ ते २०१४ हा १३ वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ आणि त्यानंतर १० वर्षे पंतप्रधानपद एकूण २३ वर्षे मोदी सत्तेत आहेत. तसंच आजपासून पुढची दहा वर्षे आपण सत्तेत असणार आहोत असाही दावा त्यांनी सेंट्रल हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या भाषणात केला आहे.

संघ कार्यकर्ते म्हणून कारकीर्द सुरु
नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून केली होती. त्यांच्या महाविद्यालयीन आयुष्यात ते संघाचे प्रचारकही होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेही ते सदस्य झाले. १९९० च्या काही काळ आधी ते राजकारणात आले. भाजपा या पक्षात त्यांचा प्रवेश झाला होताच. लालकृष्ण आडवाणी यांच्यासह त्यांनी राम मंदिराच्या रथयात्रेतही भाग घेतला होता. गुजरातमध्ये भाजपाची मूळं बळकट करण्यात नरेंद्र मोदींचा मोठा वाटा आहे. त्यांना या सगळ्या राजकीय प्रवासात अमित शाह यांचीही साथ लाभली. लालकृष्ण आडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांना नरेंद्र मोदी गुरुस्थानी मानतात. कट्टर संघ समर्थक आणि हिंदुत्ववादी नेते अशी नरेंद्र मोदींची ओळख आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!