Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीअखेर तिढा सुटला ! कोकण पदवीधर निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसमध्ये सामना :...

अखेर तिढा सुटला ! कोकण पदवीधर निवडणुकीत भाजप व कॉंग्रेसमध्ये सामना : शिवसेनेची माघार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाविकास आघाडीत मनभेद झाले असल्याची चर्चा सुरू असताना आज कोकण, मुंबई व नाशिक विधान परिषद निवडणुकीत अखेर समन्वयाने तोडगा काढत, मविआने सर्व चर्चांना विराम दिला. कोकण पदवीधर मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर जैन तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया या दोघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या दोन्ही उमेदवारांकडून काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एकीकडे, महाविकास आघाडीतील उमेदवारीचा तिढा सुटत असताना कोकण पदवीधर मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय मोरे यांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर असा थेट सामना रंगणार आहे.

काँग्रेसच्याही दोन उमेदवारांची माघार

काँग्रेस हायकमांड आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसच्याही दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सोनावणे यांना फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं. तसंच नाशिक पदवीधरमधील काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनीही माघार घेतली आहे. 

पदवीधरसाठी २२, शिक्षक मतदारसंघासाठी २० अर्ज

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघासाठी २२ अर्ज दाखल झाले होते. मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये १० अर्ज दाखल झाले होते, त्यात उद्धवसेना, शिंदेसेना, भाजपच्या उमेदवारांचा समावेश होता. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी २० अर्ज दाखल झाले. यात उद्धवसेना, शिंदेसेना, समाजवादी रिपब्लिकन पार्टी, अजित पवार गट, काँग्रेस उमेदवारांचा समावेश आहे.

उद्धव ठाकरेंनी काय भूमिका मांडली?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विधानपरिषद निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली. “महाविकास आघाडीत बिघाडी नाही. संवादात थोडं लूज कनेक्शन होतं, कारण मी लोकसभा निवडणूक झाल्यावर सात आठ दिवस बाहेर गेलो होतो. दरम्यानच्या काळात विधानपरिषद निवडणुकीच्या तारखा जवळ आल्या होत्या. त्यामुळे सर्व पक्षाने विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केले होते. दिल्लीतल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून माझ्याशी आणि संजय राऊतांशीही फोनवरून संवाद झाला. त्यामुळे नाशिक, कोकण याबाबत आम्ही समझोता करतोय. निवडणूक झाल्या झाल्या मी इथं नव्हतो. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायचे सुरू होते. अर्ज न भरण्यापेक्षा अर्ज भरून ठेवलेला चांगला म्हणून आम्ही अर्ज भरले होते, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!