Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीBJP चा अहंकार आणि परंपरेला तडा ! इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांची...

BJP चा अहंकार आणि परंपरेला तडा ! इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांची उमेदवारी दाखल

Lok Sabha Speaker Election :अकोला दिव्य ऑनलाईन : देशाच्या लोकशाही इतिहासात पहिल्यांदाच १६ आणि १७ अशा सलग दोन लोकसभा सभागृहात विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद आणि उपसभापती देण्याची परंपरा खंडित करुन भाजपचे सर्वशक्तिमान नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन इतिहास रचला. पण १८ व्या लोकसभेत संपूर्ण बहुमत मिळाले नाही म्हणून, ४ घटकपक्षांच्या पाठिंब्यावर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तब्बल १० वर्षाची सवय मात्र कायम असल्याने, लोकसभा सभापतीची अविरोध निवड करण्याची ७० वर्षांच्या सुदृढ परंपरेला यामुळे तडा जाणार असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एनडीएकडून ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार बनवण्यात आले आहे. एनडीएच्या मित्रपक्षांनी ओम बिर्ला यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.  तर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना ओम बिर्ला यांना समर्थन देण्याची विनंती केली होती. विरोधकांनी प्रथेनुसार एनडीएकडे उपाध्यक्षपदाची मागणी केली होती. मात्र त्याबाबत कोणताही प्रतिसाद न आल्याने आता इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीकडून काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे.

संसदीय लोकशाहीमध्ये अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारताच्या राज्यघटनेतील कलम ९३ नुसार, अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीची तरतूद आहे. या कलमानुसार, लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर लवकरात लवकर या दोन्ही पदांची निवड करण्याचा नियम आहे. सभागृहातील बहुमतानुसार अध्यक्षांची निवड केली जाते. अध्यक्षांनी राजीनामा दिला नसेल अथवा ते पदावरून दूर झाले नसतील, तर लोकसभा बरखास्त झाल्यानंतर सभापतींची मुदतही संपुष्टात येते. घटनेच्या कलम ९४ नुसार, १४ दिवसांचा सूचना कालावधी देऊन सभापतींविरोधातही अविश्वासदर्शक ठराव मांडता येतो. इतर सदस्यांप्रमाणेच अध्यक्षांनाही अपात्रतेचा सामना करावा लागू शकतो. अध्यक्षपदी येण्यासाठी कोणतीही विशेष पात्रता असावी लागत नाही. त्यामुळे सभागृहातील कोणताही सदस्य अध्यक्ष होण्यास पात्र आहे. मात्र, सभागृहातील इतर सदस्यांपेक्षा अध्यक्ष हे पद निश्चितच अधिकार आणि पात्रतेच्या दृष्टीने वेगळे ठरते.

लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपाकडून ओम बिर्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. परंतु, ऐनवेळी इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्षपदी उमेदवार जाहीर केला. काँग्रेसचे के. सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत आता ट्विस्ट आला आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले, “मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला. राजनाथ सिंह यांनी खरगे यांच्याकडे त्यांच्या अध्यक्षपदासाठी पाठिंबा मागितला. परंतु, आम्ही स्पष्टपणे सांगितले की आम्ही अध्यक्षांना पाठिंबा देऊ पण विरोधकांना उपाध्यक्ष पद मिळायला हवे. ते पुन्हा फोन करणार होते. परंतु, त्यांचा आतापर्यंत फोन आलेला नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!