Saturday, November 9, 2024
Homeगुन्हेगारीयवतमाळात सावकाराच्या अपहरणाचा डाव ! 6 जणांना अटक ; एका बालकाचाही समावेश

यवतमाळात सावकाराच्या अपहरणाचा डाव ! 6 जणांना अटक ; एका बालकाचाही समावेश

अकोला दिव्य ऑनलाईन : सावकाराचे अपहरण करून खंडणी उकळण्यासाठी आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. यात एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अन्य साथीदारांना धामणगाव रेल्वे व अन्य एका ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. सावकाराचे अपहरण करून दरोडा व खंडणीचा गुन्हा पोलिसांनी काही तासांत उघडकीस आणला.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील सथी सत्यनारायण रेडी (४२) वसुली करून घरी जात असताना राळेगाव येथील एका मंगल कार्यालयाजवळ सहा जणांनी त्यांना अडविले. चाकूचा धाक दाखवून त्यांचे दुचाकीसह अपहरण केले व जबरीने त्यांच्याकडील सव्वा लाख रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर देखील वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून जिवे मारण्याच्या व परिवाराला त्रास देण्याच्या धमक्या देत पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. सावकाराकडून १५ हजार ८०० रुपये ऑनलाईन घेतले. या प्रकारामुळे घाबरलेल्या सावकाराने राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून कलम ३६४ (अ), ३९५, ३८७ भादंवी अन्वये गुन्हे दाखल झाले.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले. त्यावरून पथकाने तांत्रिक बाबींचे अवलोकन करून अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, तिघेजण खंडणीची रक्कम घेण्यासाठी राळेगाव येथे फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेले तेजस संतोष भेंडारकर (२१, रा. सिंघानियानगर, यवतमाळ), पृथ्वी देविदास पवार (२३) या दोघांसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अन्य आरोपींची नावे उघड झाली.

या घटनेतील मुख्य सूत्रधार सौरभ उर्फ हेकडी राजेंट पंडागळे (२०, रा. सिंघानियानगर), प्रणव रवींद्र शिदे (२१, रा. लोहारा) यांना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील रेल्वेस्टेशन येथून, तर सूरज विलास कुरकुडे (२७), अभिजित शंकर शिवणकर (२२, रा. राळेगाव) यांना राळेगाव येथून ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी पळून जाण्याच्या बेतात होते. मात्र पोलिसांनी त्यांच्या साथीदारांकडून माहिती घेत वेळीच कारवाई करत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक केली. या सहाही आरोपींना पुढील तपासासाठी राळेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत असून, त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, मकोका, आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींकडून अनेक घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गणेश वनारे, अमोल मुडे, विवेक देशमुख, धनराज हाके, रामेश्वर कांडुरे आदींनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!