Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाट्रोल करणाऱ्यांना 'हार्दिक' ची चपराक ! ...... अनेकदा रडू वाटलं, पण…;...

ट्रोल करणाऱ्यांना ‘हार्दिक’ ची चपराक ! …… अनेकदा रडू वाटलं, पण…; पांड्याचा शब्दांनी सर्वच भावुक

अकोला दिव्य ऑनलाईन : टी-२० विश्वचषकाच्या अंतिम रोमहर्षक सामन्यात भारताने मिळवलेल्या यशात सांघिक कामगिरी महत्त्वाची ठरली. अष्टपैलू हार्दिक पांड्याने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाच्या हातून निसटत असलेल्या सामन्यात विजयश्री खेचून आणण्यात यश मिळवलं. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रिक क्लासेनच्या फटकेबाजीमुळे विश्वचषक भारतापासून दूर जात असल्याचं दिसत होतं. मात्र हार्दिक पांड्याने कमाल केली आणि आधी हेन्रिक क्लासेनना बाद करत आफ्रिकेला धक्का दिला तर शेवटच्या षटकात १६ धावांचा यशस्वी बचाव करत विश्वचषक जिंकण्याचं १४० कोटी भारतीयाचं स्वप्न साकार केलं.

तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक उंचावल्यानंतर भारतीय संघातील सर्वच खेळाडू भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. विजयाच्या आनंदात रोहित शर्मा मैदानात कोसळला, तर विराट कोहली, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळू लागले. मागील काही महिन्यांपासून ट्रोलिंग सहन करत असलेल्या हार्दिक पांड्या याने या विजयानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. माझे मागील सहा महिने जे गेले होते ते पुन्हा आल्यासारखे वाटत आहेत. या काळात मी स्वत:वर खूप नियंत्रण ठेवलं. अनेकदा मला रडायला येत होतं, मात्र मी रडलो नाही. कारण माझ्या वाईट काळाचा आनंद घेणाऱ्यांना मला आणखी आनंद द्यायचा नव्हता आणि त्यांना मी कधीही आनंद देणार नाही. मात्र देवाची कृपा बघा…मला शेवटचे षटक टाकायची संधी मिळाली…मी आता निशब्द झालो आहे, असं हार्दिक पांड्याने म्हटलं आहे.

विजयाचा आनंद व्यक्त करताना पुढे हार्दिक पांड्या म्हणाला की, जसप्रीत बुमराह आणि शेवटची पाच षटकं टाकणाऱ्या सर्वच गोलंदाजांना या विजयाचं श्रेय द्यावं लागेल. मी शांत राहिलो नसतो, तर अशी कामगिरी करू शकलो नसतो, हे मला माहीत होतं. त्यामुळे मी संयम ठेवण्याचा प्रयत्न केला. दबावाच्या परिस्थितीत खेळणं मला नेहमीच आवडतं. आपल्या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी मी खूप आनंदी आहे. एक व्यक्ती म्हणून ते खूप चांगले आहेत. संघात त्यांच्यासोबत काम करायला मजा आली.दरम्यान, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील कथित संघर्षाबाबत सोशल मीडियावर अनेकदा कुजबुज सुरू असते. मात्र कालचा सामना संपल्यानंतर रोहितने हार्दिक पांड्याच्या गालावर किस करत मारलेली मिठी टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी सुखावणारी ठरली.

गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेतही भारताने अपराजित राहत अंतिम फेरी गाठली होती. विशेष म्हणजे स्पर्धेत अपराजित राहून टी-२० विश्वचषक पटकावणारा भारत पहिला संघ ठरला. भारताच्या या शानदार विजयानंतर देशभरात भर पावसामध्ये दिवाळी साजरी झाली. रात्रभर क्रिकेटप्रेमींनी रस्त्यांवर जल्लोष करून टीम इंडियाचा जयजयकार केला. भारत माता की जय, मुंबईचा राजा रोहित शर्मा, बुम बुम बुमराह अशा घोषणा देत क्रिकेटप्रेमींनी शनिवारची रात्र गाजवली. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!