अकोला दिव्य ऑनलाईन : एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपीला ३ वर्ष सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ वर्षे अधिकचा सश्रम कारावासाची शिक्षा अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी सुनावली. अकोट येथील श्रीराम नगर येथे राहणारा ऋषिकेश उर्फ मोन्या पद्माकर तेलगोटे (२१) याने एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे सिध्द झाल्याने आरोपी तेलगोटेला भादंविचे कलम ३५४ (क) प्रमाणे ३ वर्षे सश्रम कारावास २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ वर्षे अधिकचा कारावास, तसेच पाक्सो कलम ८ प्रमाणे ३ वर्षाचा कारावास आणि १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला. वरील प्रमाणे दंड भरल्यास त्यापैकी ३० हजार रुपये पीडितेला देण्यात यावे. आरोपीऐ दोन्ही शिक्षा एकत्रीतपणे भोगावयाच्या आहेत.
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, अल्पवयीन मुलगी रात्री १०.३० वाजता आजी सोबत घराच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत अंधारात नैसर्गिक विधी करीता गेली होती. मोकळ्या जागेत आजीपासून काही अंतरावर नैसर्गिक विधी करीता गेली असताना आरोपी ऋषीकेश उर्फ मोन्या तेलगोटे आला व त्याने एकदम कवठ्यात पकडले. पीडितेने आरडाओरड केला असता आरोपी आजीला लोटून देवून पळून गेला. या रिपोर्ट वरून अकोट शहर पोलीस स्टेशनला ७ जानेवारी २०१९ रोजी आरोपी विरूध्द भादंवि कलम ३५४, ३५४ (क) सहकलम ७, ८ पाक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतले. तपास अधिकारी एम. पी. गवई यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकारी वकील पी. बी.सहारे यांनी एकुण ७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. पैरवी म्हणुन अकोट शहर पोलीस स्टेशनचे प्रकाश जोशी ब.न.१३५५ यांनी सहकार्य केले. सरकारी वकील पी. बी. सहारे यांनी या प्रकरणात युक्तीवाद केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.