अकोला दिव्य ऑनलाईन : गीता नगर भागात गौरक्षण फिडर वरून वीज पुरवठा करण्यात येत होता. तर गौरक्षण फिडरवरून अनेक भागांना विद्युत पुरवठा होत असल्याने, कोणत्याही भागात बिघाड झाला की गीता नगर परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात येतो. त्यामुळे वाशिम बायपास फिडर वरून विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी मागणी माजी महापौर मदन भरगड यांनी केली होती. त्यानंतर ठेकेदाराने विद्युत खांब बसवले. मात्र केबल न टाकल्याने काम अर्धवट असल्याने महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी मदन भरगड यांनी शेकडो नागरिकांसह विद्युत रोहित्राची महाआरती केली.
गौरक्षण रोड फिडर वरून कैलास टेकडी, खदान व इतर अनेक भागात विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे गौरक्षण रोड फिडरवर मोठ्या प्रमाणात ताण येत होता. त्यामुळे दररोज कोणत्यातरी भागात बिघाड होत होता. परिणामी मानव शोरूम पासून हिंगणा मंदिर गीतनगर, स्नेहनगर , पोलीस वसाहत, अकोलीखुर्द, एमरॉल्ड कॉलोनी, रेणुका डुप्लेक्स, रूपचंद नगर, मातोश्रीनगर, हिंगणा, सोमठाना पर्यंत विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत होता. दररोज होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रासले होते.

तेव्हा माजी महापौर मदन भरगड यांनी तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन नागरिकांची समस्या सांगितली. बच्चू कडू यांनी विद्युत खांब टाकून वाशिम बायपास फिडर वरून वीज पुरवठा देण्यासाठी निधीची तरतूद केली. वर्क ऑर्डर काढण्यात आली. वाशिम बायपास ते कलोरे कॉम्प्युटर पर्यंत विद्युत खांब उभारण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षापासून केबल न टाकल्याने काम अर्धवटच होते. त्यामुळे विद्युत पुरवठा गौरक्षण फिडरवरूनच असल्याने दररोज नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
अखेर सहनशीलता संपल्याने मदन भरगड यांच्या नेतृत्वात गीता नगर परिसरात रोहित्राची महाआरती करण्यात आली. या अनोख्या आंदोलनाने वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. महाआरतीला राजेद्र चितलांगे, गणेश कटारे , रघुनाथ खडसे , अभिषेक भरगड, गणेश कळसकर, रमेश जैन, सागर सरकटे, सुरेश कलोरे, वसंत तिवारी, अशोक अपुर्वा अमीत शर्मा, मनोजीत बागरेचा, सुशील बागरेचा, अमीत बागरेचा, कमल गट्टाणी, बालू पाटील, मुकेश अग्रवाल, अमोल यादव चन्दकातं अवतनकर ,दुर्गैश ठाकुर, कुदंन ठाकुर, रितीक डोगंरे, संदीप कलोरे, शुभम अबूलकर, प्रमोट अठराले, अमोल तिहिले, मसाराम कोरडे, प्रकाश गवाई, श्रीकांत उसने, प्रमोद वेरूलकर, विनोद मराठे यांची उपस्थिती होती.