अकोला दिव्य ऑनलाईन : बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आता बदलापूरच्या रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान भर गर्दीच्या वेळेस फिल्मी स्टाईलने गोळीबार करण्यात आला. गोळीबार होताच प्रवाशांची धावाधाव सुरू झाली होती.
आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान कामावरून परतणाऱ्या बदलापूरकरांना गोळीबाराला सामोरे जाण्याची वेळ आली. एका इसमाने रेल्वे स्थानकातच गर्दीच्या वेळेस दुसऱ्या तरुणावर गोळीबार केला. दोन ते तीन राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यात कोणी जखमी झाले आहे की नाही हे अद्यापही स्पष्ट नसले तरी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक माहिती घेतली, तपास आता पोलिसांनी चालू केला आहे.