अकोला दिव्य ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींची अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडल्यानंतर मनसैनिक जय मालोकार यांचा घटनेच्या दिवशी मृत्यू झाला होता. आता जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता असून मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा जबर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं कारण शवविच्छेदन अहवालात उघड समोर आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. तेव्हा आ. मिटकरींनी राज ठाकरे यांना सुपरीबाज म्हणत टीका केली होती. त्यामुळे राज्यभर मनसैनिक आक्रमक झाले होते. अकोल्यात मनसे सरचिटणीस कर्णबाळा दूनबळे यांच्या पत्रकार परिषदेनंतर विश्रामगृह येथे आलेले आ. मिटकरींच्या गाडीला लक्ष करुऊ मनसे पदाधिकारी यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. मिटकरींच्या तक्रारीवरून मनसैनिक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. गाडी तोड प्रकरणात सहभागी मनसैनिक जय मालोकार यांचा यावेळी मृत्यू झाला होता. तेव्हा हा मृत्यू हृदय विकाराने झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली होती.
जय मालोकारच्या मृत्यूला वेगळं वळण!
दरम्यान मृतक जय मालोकार यांच्या मृत्यूचे कारण हृदय विकाराचा झटका असल्याचं सांगितलं जातं असतानाच आता शवविच्छेदन अहवालात आलेल्या धक्कादायक कारणामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. जय मालोकार यांचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान जय मालोकार यांच्या कुटूंबीयांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याच्या शरिरावर ह्या जखमा आल्या कुठून याचीही चौकाशी करावी अशी मागणी जय मालोकारचा भाऊ विजय मालोकार यांनी केली आहे.