गजानन सोमाणी• एडिटर इन चीफ : बदलापूर बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणात झालेले आरोपीचे एन्काउंटर आणि त्यानंतर लोकांनी पेढे वाटून, फटाके फोडून, नाचून एंजॉय करत एन्काउंटरला दिलेला प्रतिसाद बघता, भविष्यात दिसला बलात्काराचा आरोपी की करा त्याचा एन्काउंटर, टाक त्याला मारून, हा ट्रेंड त्यामुळे प्रचलित होण्याचा मोठा धोका निर्माण होईल. यापुर्वीही अशा एन्काउंटरचा प्रयोग राजकारण, धर्माकरण, पोलिसांचा किंवा कोणाचा तरी स्वार्थ इत्यादि कारणांमुळे झाल्याचे चव्हाट्यावर आले आहे. हे विसरून चालणार नाही.
बलात्कार करणार्याला कडक शिक्षा व्हावी याबद्दल कुठलंही दुमत नाहीच नाही.आपल्याकडे कायदा आहे आणि शिक्षा देण्याचे काम देशातील न्यायालयाचे असून, शंका घेण्यास कारण नाही. तेव्हा पोलिसांनी एन्काउंटर करून किंवा जनतेने मॉब लिंचिंग द्वारे हे काम करायचे नसते. बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर झाला म्हणून पेढे वाटत असताना, फटाके फोडत असताना, नाचत असताना, सेलीब्रेट करत असताना आपण न्यायव्यवस्थेचे बारा वाजवत आहोत आणि आपल्या पुढच्या पिढ्यातील पुरुषांची कबर खोदण्याची व्यवस्था करीत आहोत. हे लक्षात ठेवावे. यासोबतच हे देखील लक्षात असू द्या की, आज सुपात असलेले तुम्ही उद्या जात्यात असाल हे विसरू नका.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर आता वादग्रस्त ठरले असून मुंबई हायकोर्टानेही यावरून ताशेरेच ओढले नाही तर एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रमच संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एवढंच नव्हे तर हे एन्काउंटर असूच शकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तेव्हा न्यायालयाबाहेर जर प्रकरणांचे असे परस्पर निकाल लावून शिक्षा दिली जाणार असेल तर…तर, खोटी केस टाकून एन्काउंटर करण्याचे रॅकेट सुद्धा अस्तीत्वात येऊ शकते.
एकदा का तुमच्यावर बलात्काराची केस दाखल झाली की तुम्ही बलात्कार केलेला असो वा नसो, तुम्ही वरील न्यायाने बलतात्कारीच ठराल. मग कोर्ट वगैरे राहिले बाजूला, एक तर एन्काउंटर किंवा झुंडबळी व्हायची तयारी ठेवावी लागेल. आणि त्यात अनेक निष्पाप पुरुषांचा नाहक बळी जाऊ शकतो. याच रॅकेटचा अजून एक पैलू म्हणून तुमच्या ध्यानी मनी नसताना, भर रस्त्यात कोणीतरी महिला तुमच्या जवळ येऊन, याने माझ्यावर बलात्कार केला म्हणून बोंबा ठोकू शकते आणि आसपास उभे असलेले रॅकेटमधील लोक तसेच आता मॉब लिंचिंगसाठी सरावलेला जमाव मिळून तुम्हाला एवढे ठोकून काढतील की तुम्ही जीवंत देखील राहू शकणार नाही. इथे तर पोलीसात केसही दाखल झालेली नसेल.
मग हा बलात्काराचा आरोप असलेला आणि नाहक बळी जाणारा निष्पाप पुरुष एखाद्या पुरुषाचा किंवा महिलेचा मुलगा, बाप, भाऊ, कोणीही असू शकेल. आणि हो, तुम्ही स्वतःही असू शकाल. तुमचा बळी गेल्यावर सुद्धा पेढे वाटले जातील, फटाके फोडले जातील, लोक नाचून सेलीब्रेट करतील, जसे बदलापूर आरोपीचे एन्काउंटर झाल्यावर लोकांनी केले.
काही वर्षांपूर्वी एका रॅकेटचा भांडाफोड झाल्यावर जे उघडकीस आले. ते आज प्रकर्षाने आठवत आहे. कारण त्या रॅकेटचा मोडस ऑपरेंडीत उल्हासनगर, मुंबई परिसरातील काही लोक सुट्ट्या एंजॉय करायला शेजारच्या गुजरात राज्यात तसेच सिल्व्हासा येथे जात. ते परत आल्यावर काही दिवसांनी गुजरातचे पोलिस अशाच एंजॉय करून आलेल्यांपैकी एकाच्या दारात अटक वारंट घेऊन येत. त्यात त्या व्यक्तीने गुजरात मध्ये एका आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप केलेला असे. पोलिस एफआयआर दाखवायचा. त्यात त्या व्यक्तीचा गाडी नंबर, त्याचे वर्णन, नाव वगैरे सगळे जुळायचे. मग आपण त्या भागात एंजॉय करायला त्याच सुमारास गेलो होतो ते त्याला आठवायचे आणि बलात्काराची तारीख जुळायची.मग त्या व्यक्तिला काहीही सुचत नसे. व्यक्तीचा, कुटुंबाचा धीर पूर्णतः खचला की प्रकरण मांडवलीवर यायचे.
शेवटी कथित बलात्कार्याच्या औकातीनुसार ५० हजार ते एक-दोन लाखात (त्या काळातील रुपये) प्रकरण मिटवयाचे. हे रॅकेट चालवणारी गॅंग, एंजॉय करायला गुजरातेत जाणार्यांच्या मागावर असे. ते त्यांची गाडी घेऊन कुठे कुठे जातात याचे फोटो सहित पुरावे गोळा करत आणि त्या तारखेला, त्या ठिकाणच्या जवळपासच्या खेड्यातील एका आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याची फिर्याद दाखल करत असत. सगळे काही मिलिभगत अनुसार होत होते. या रॅकेटचा मोडस ऑपरेंडी प्रमाणे अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरवर लोकांनी केलेला जल्लोष बघता, त्या रॅकेट प्रमाणेच मोडस ऑपरेंडीने बलात्काराचा खोटा आरोप करीत गुन्हा दाखल करून घ्यावा, जनतेत आक्रोश निर्माण झाला की……. योग्य मोबदला मिळाला की, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सारखाच मात्र खोट्या आरोपातील निरपराध कथित आरोपीचा एन्काऊंटर ठरलेला असेलच ना?