Ajit Pawar Targets Sharad Pawar in Baramati : अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळत आहे. अनेक मतदारसंघांमध्ये नाराज बंडखोरांनी आव्हान उभं केलं असून मनसे व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळेही निवडणूक तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा आहे ती बारामती विधानसभा मतदारसंघाची. इथे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा काका-पुतण्या वादाचा पुढचा अंक दिसत आहे. बारामतीत प्रचारादरम्यान अजित पवारांनी याचाच उल्लेख करत थेट शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.
बारामतीमध्ये पुन्हा काका-पुतण्या!
शरद पवार व त्यांचे पुतणे अजित पवार या दोघांनाही बारामतीच्या जनतेनं निवडून विधानसभा वा लोकसभेवर पाठवलं. पण गेल्या दोन वर्षांत बारामतीकरांनी या काका-पुतण्यामधला पराकोटीचा विकोपाला गेलेला वादही पाहिला. त्यापाठोपाठ आता अजित पवार व त्यांचे पुतणे आणि बारामतीमधील विरोधी उमेदवार युगेंद्र पवार यांच्यातला उभा सामना बारामतीकर पाहात असून दोन्ही बाजूंनी वारंवार कौटुंबिक संदर्भ देऊन एकमेकांवर टीका होताना दिसत आहे
अजित पवारांनी आज बारामतीमध्ये प्रचारादरम्यान युगेंद्र पवार आपला पुतण्या असून मुलासारखा असल्याचं विधान केलं. “मी समोरच्यावर टीका करायला गेलो, तर तो माझा पुतण्या आहेत. मला तो मुलासारखा आहे. पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांच्या एकमेकांवर टीका करतोय असं होईल. ते मला करायचं नाहीये. मी पुन्हा सांगतो की भावनिक होऊ नका”, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.
दरम्यान, एकीकडे भावनिक होऊ नका असं सांगताना अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीबाबत केलेलं विधान चर्चेत येत आहे. शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना राज्यसभा खासदारकीची दीड वर्षाची टर्म शिल्लक असून त्यानंतर पुन्हा खासदार व्हायचं की नाही याचा विचार करेन, असं सूचक विधान केलं होतं. त्यांच्या विधानावरून तर्क-वितर्क लावले जात असून त्यावरूनच अजित पवारांनी बारामतीकरांना पुढे वाली उरणार नाही, असं विधान केलं आहे.
तालुक्याच्या पुढाऱ्यांवरची नाराजी माझ्यावर काढू नका. भावनिक होऊ नका. आता कुणीतरी मला म्हटलं की त्यांनी फक्त शरद पवारांचा भलामोठा फोटो लावला आहे आणि त्यांचं चिन्ह लावलं आहे. ही निवडणूक शरद पवारांची आहे का? निवडणूक शरद पवारांची नाहीये. लोकसभेला तुम्ही थोडीशी गंमत केली. पण मी आता ते सगळं काढत नाही. आता मात्र विधानसभेला ती गंमत करू नका. नाहीतर तुमची जंमतच होईल. मी खोटं सांगत नाही”, असं अजित पवार म्हणाले.तुमच्या लक्षात येत नाही.
तुम्ही काही भावनिक करायचा प्रयत्न केला, तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. शरद पवारांनी सांगितलं आहे की दीड वर्षांनी ते पुन्हा उभे राहणार नाहीत, निवडणूक लढवणार नाही, खासदारही होणार नाहीत. त्यानंतर कोण बघणार आहे? कुणात तेवढी धमक आहे? कुणात तेवढी ताकद आहे याचा विचार करा”, असं विधान यावेळी अजित पवारांनी केलं.
आपल्याला अजून सुपा परगणा आणि बाकीच्या भागात करायची आहे. माझ्या कारकिर्दीत पाण्याच्या बाबतीत माझ्या भागाला मी स्वयंपूर्ण केलं आहे हे मला कृतीतून दाखवायचं आहे. शरद पवारांनीही २४ वर्षांत पाझर तलाव वगैरे गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून आपला प्रश्न निकाली निघालेला नाही”, असंही अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.