अकोला दिव्य ऑनलाईन : पश्चिम विदर्भातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिष्ठा करुन घेतलेल्या बाळापूर विधानसभा मतदारसंघातील आज प्रचारातील शेवटच्या दिवशी माजी आमदार व शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार बळीराम सिरस्कार यांनी ‘धनुष्य बाण’ ने विजयाचा अचूक नेम घेतला आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून मतदारांची मोट बांधण्यात सिरस्कार यशस्वी झाले असून, मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे मतदार सिरस्कार यांच्याकडे वळते होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जवळपास अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमध्ये अगोदर सहभागी होऊन, नंतर गुवाहाटी येथून माघारी आलेले उध्दव ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांनी वेळी घेतलेली घुमजाव भुमिके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिव्हारी लागलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ शिवसेनाच लढविणार, असा प्रण घेऊन शिंदे यांनी प्रतिष्ठा करुन बाळापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी ताब्यात घेतला.
उबाठा शिवसेनेचे उमेदवार आणि आमदार नितीन देशमुख यांना टक्कर देण्यासाठी, व्युहरचना आखताना जातीय समीकरणे लक्षात घेऊन त्यापेक्षा जास्त वजनदार उमेदवार देण्याची गरज लक्षात घेऊन भाजपाच्या पाठिंब्याने भाजपाचे बळीराम सिरस्कार यांचा पक्ष प्रवेश करुन घेऊन त्यांना उमेदवारी दिली. एवढेच नव्हे तर बाळापूर मतदार संघ उध्दव ठाकरे यांच्याकडून ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे या मतदारसंघावर जातीने लक्ष घालून आहेत. यासाठी ‘रोख-चोख-ठोक’ नियोजन करण्यासाठी पुरेपूर दक्षता घेतली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करुन सिरस्कार यांनी कच्चे दुवे मजबूत करणे सुरू केले आणि मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा यशस्वी केली. मुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाल्यानंतर प्रचाराचा झपाटा वाढत जाऊन मतदारसंघात वातावरण बदलून गेले. निवडणूक लढण्याचा अनुभव, नेटके नियोजन आणि शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहभागी करून घेत उमेदवार सिरस्कार यांनी अखेर प्रचारात आघाडी घेतली आहे.
मोठ्या विश्वासाने मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवारी दिल्याने सिरस्कार यांनीही चंग बांधला. शिंदे गटातील नाराजी दूर करण्यासह योग्य समन्वय राखण्यात यश मिळाले. बाळापूर विधानसभा काबीज करण्यासाठी भाजपचा पाठिंबा आणि सिरस्पाकार यांचे पाठीराखे, जुन्या पक्षातील सहकारी तसेच अल्पसंख्याक व इतर जाती जमातींच्या मतदारांची मोट बांधून काढली. शिवसेनेचे पाळेमुळे घट्ट रोवणाऱ्यांवर जबाबदारी सोपवून बळीराम सिरस्कार यांनी तगडे आव्हान उभं केलं आहे.दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अँड खतीब पिछाडीवर गेल्याने, सिरस्कार यांचा लढत सोपी होत असल्याचे मतदारसंघाचा फेरफटका मारताना जाणवते. आज खुल्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून, आता अंतर्गत घडामोडी अधिक वेगाने होईल.