Thursday, December 12, 2024
HomeUncategorizedभाजप 'अडकित्यात' ! शिंदेंना मुख्यमंत्री नाही केले तर ?...तर ठाकरेंचं 'कमबॅक'

भाजप ‘अडकित्यात’ ! शिंदेंना मुख्यमंत्री नाही केले तर ?…तर ठाकरेंचं ‘कमबॅक’

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत. अत्यंत प्रचंड आणि घवघवीत यश महायुतीला मिळालं आहे. मागच्या तीन दशकात एकाही युती किंवा आघाडीला असं यश मिळवता आलं नव्हतं. २३ नोव्हेंबरच्या या निकालावर विरोधकांनी काही प्रमाणात संशय व्यक्त केला आहे. मात्र आता महायुतीसमोरचा पुढचा पेच आहे मुख्यमंत्री कोण?

या दरम्यान आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विसर्जित झालं आहे. राजभवनावर पोहचत एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे १४ वी विधानसभा विसर्जित झाली आहे. सकाळपासून महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, हा एकच प्रश्न सर्वतोमुखी आहे. भाजपला महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे, अशी मागणी भाजपच्या कार्यकत्यांनी लावून धरली आहे. फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचे यादृष्टीने भाजपच्या गोटातही पूर्ण तयारी झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्रीपद जाणार याची कुणकुण लागताच शिंदे कमालीचे सावध झाले आहेत. त्यांनी सोमवारी संध्याकाळपासून सगळ्या भेटीगाठी रद्द केल्या तर भाजपकडून अद्याप अपेक्षित हालचाली घडत नसल्याने पडद्यामागे नेमक्या काय हालचाली सुरु आहेत, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत येत सत्तास्थापन केली होती. तेव्हा भाजपकडे १०५ आमदारांचे पाठबळ होते. यंदा भाजप सत्तास्थापनकरण्यापासून फक्त ८ जागा दूर आहे. तरीही भाजप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी सावधपणे पावले का टाकत आहे, हा प्रश्न अनेकांना पडत आहे. इतके प्रचंड यश मिळूनही भाजपने अद्याप देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड का केली नाही ?

यंदाच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपाचे १३२ आमदार मिळवून अपक्ष आणि लहान घटकपक्षांच्या पाठबळावर भाजपचे संख्याबळ १३७ पर्यंत जाऊन पोहोचला आहे.याचा अर्थ भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी सक्षम आहे. आता १३७ आमदारांचे आणि अजित पवार गटाचे पाठबळ आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याने एकनाथ शिंदे भाजपवर पूर्वीइतका दबाव टाकू शकत नाहीत. इतक्या सगळ्या गोष्टी अनुकूल असतानाही भाजप एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेण्याबाबत सगळ्या बाजू तपासून पाहत आहे. याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता उद्धव ठाकरे यांची ताकद किमान पुढील पाच वर्षासाठी जवळपास संपल्यात जमा आहे, असा अनेकांचा समज आहे. मात्र, जरा बारकाईने विचार केल्यास उद्धव ठाकरे यांना मुंबईत मिळालेल्या १० जागा अजूनही भाजपसाठी डोकेदुखी मानली जात आहे. राज्यभरात ठाकरे गटाचा सुपडा साफ झाला असला तरी मुंबईत त्यांची ताकद अजून शिल्लक आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी १० जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत. तर शिंदे गटाला ६ जागा आणि भाजपला १४ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गट कमबॅक करण्याची शक्यता नाकारता येल नाही.

एकनाथ शिंदे यांच्या ठिकाणी फडणवीस यांना मुख्यमंत्री केले तर शिवसेनेत नाराजी पसरले आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला आयते कोलीत मिळेल. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका ही मुंबई महापालिका आहे. मुंबई पालिकेचा २७ हजार कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प हा देशातील अनेक राज्यांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे मुंबईची सत्ता काबीज करणे, भाजपसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे समजा आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या जातील याची भाजपला पुरेपूर कल्पना आहेच.

निवडणूक महानगरपालिकेची असली तरी त्यामागे अनेक आर्थिक गणिते आहेत. ठाकरे गटाला पालिकेची सत्ता मिळाल्यास त्यांना प्रचंड मोठी आर्थिक रसद उपलब्ध होऊ शकते. याचा वापर करून राज्याच्या राजकारणात पुन्हा मुसंडी मारण्याचा धोका नाकारता येत नाही. याशिवाय, महायुती सरकारच्यादृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पातही अडथळे येऊ शकतात. या सगळ्या कारणांमुळे एकनाथ शिंदे यांना तुर्तास मुख्यमंत्रीपदी कायम ठेवणे, ही भाजपची गरज मानली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!