अकोला दिव्य न्यूज : आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील लहान व मध्यम करदात्यांना आयकरात भरघोस सूट देऊन चांगलाच दिलासा दिला आहे. नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात संसदेत सादर करण्यात येईल. त्यामधे सुटसुटीत व सरळीकरण करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शहरातील सनदी लेखापाल रमेश चौधरी यांनी दिली.

नवीन कर प्रणालीत कराच्या मर्यादा व कराचे दर खालीलप्रमाणे :- ४ लाख रुपयांपर्यंत पर्यंत आयकर भरणा निरंक राहणार आहे. * ४-८ लाख पर्यंत ५ टक्के * ८-१२ लाख पर्यंत १० टक्के * १२-१६ लाख पर्यंत १५ टक्के * १६-२० लाख पर्यंत २० टक्के * २०-२४ लाख पर्यंत २५ टक्के * २४ लाख वर ३० टक्के राहणार आहे.
त्यामुळे बिना वेतन करदात्याला १२ लाखापर्यंत कर लागणार नाही. तसेच वेतन करदात्याला ७५ हजार रुपयांचे स्टॅडर्ड डिडक्शन मिळेल. त्यामुळे १२.७५ लाखापर्यंत आयकर भरावा लागणार नाही. त्यामुळे करात बचत झाल्याने करदात्याजवळ पैशांची बचत होऊन खर्चासाठी रक्कम उपलब्ध होईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. असे चौधरी यांनी सांगितले.
विलंबाने आयकर रिटर्न २ वर्षा ऐवजी ४ वर्षाचे दाखल करता येईल. वस्तु विक्रीवर १ एप्रिल २०२५ पासून टी.सी.एस बिलामध्ये लावण्याची तरतूद रद्द करण्यात आली. टी.डी.एस ची मर्यादा वाढवून देण्यात आली. तसेच सतत मागील 2 वर्षात सकल प्राप्ती 5 कोटी रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या १२ ए अंतर्गत नोंदणीकृत धर्मादाय संस्थांना नुतनीकरण ५ वर्षाऐवजी १० वर्षांनी करावे लागेल. एकंदरीत वित्तमंत्र्यांनी छोट्या व मध्यम करदात्यांना आयकरात भरघोस सूट देउन खुश केले आहे.असे मत सीए. रमेश चौधरी यांनी व्यक्त केले.