अकोला दिव्य न्यूज : शिवकालीन व जागतिक मुद्रा प्रदर्शनीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जागविण्या सोबतच जागतिक चलनाचा परिचय करून दिला आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी व नवीन पिढी सह सर्व नागरिकांसाठी हे प्रदर्शन निश्चितच प्रेरणादायी व अभ्यास करण्यासारखे आहे. असे मनोगत आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले.

शिवजयंती निमित्त ‘अक्ष करन्सीज’ तर्फे स्थानिक श्री शिवाजी पार्क मध्ये भरविलेल्या शिवकालीन व जागतिक मुद्रा प्रदर्शनीस आ. सावरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या समवेत अकोला शहर भाजपाचे अध्यक्ष जयंतराव मसने, अ.भा.लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे, मुख्य सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पवन महल्ले व इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

अक्ष करन्सीजचे संयोजक अक्षय खाडे यांनी तयार केलेल्या या संग्रहात शिवाजी महाराजांच्या काळातील नाण्यांचा फार मोठा संग्रह उपलब्ध आहे. तसेच संपूर्ण जगातील चलनी नोटांसह 1200 वर्षापासूनचा नाण्यांचा अनमोल असा संग्रह आहे.

एका छताखाली जगातील आर्थिक चलनाची माहिती मिळणे खूप मोठी उपलब्धी आहे. संपूर्ण जगातील चलन एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी बघावयास मिळत नाही. परंतु या प्रदर्शनी व संग्रहामुळे ही बाब शक्य झाली आहे. त्यामुळे असे प्रेक्षणीय व अभ्यास करण्यासारखे प्रदर्शन एकदा तरी नजरे खालून घातलेच पाहिजे. असे मनोगत याप्रसंगी आ. रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले.

सदर प्रदर्शनीस अकोला शहर व परिसरातील हजारो नागरिकांनी भेट देऊन पाहणी केली. प्रदर्शनीच्या आयोजनाकरिता अक्षय खाडे, आशय खाडे, पल्लवी खाडे, साक्षी खाडे, अँड.निखिल देशमुख, मयूर राऊत, श्रीकांत पागृत,अक्षय अरबट,आशिष सरोदे,आशिष गोसावी यांनी परिश्रम घेतले.
