अकोला दिव्य न्यूज : तुतारीचे आसमंत निनादणारे सूर, ढोल, तालबद्ध लेझीम, मशाल, शिवचरित्रातील रोमहर्षक प्रसंग दर्शविणारे देखावे, घोडे, छत्र चामरे, बालशिवाजीचे रूप घेऊन, तसेच मराठमोळ्या वेशभूषेत सहभागी झालेले चिमुकले अशा उत्साहपूर्ण वातावरणात अकोला शहरात आज ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वसंत देसाई क्रीडांगणापासून जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आलेल्या या पदयात्रेत शेकडो अकोलेकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा व शिवगीत सादर केले. त्यानंतर महाराष्ट्र गीत सादर झाले.

तुतारीच्या निनादात मशाल पेटवून छत्रपती शिवरायांचा जयजयकार करत पदयात्रेचा आरंभ झाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, जि. प. अति. सीईओ विनय ठमके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, राजश्री कोलखेडे, शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर, रतनसिंग पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश भट आदी यावेळी उपस्थित होते.

‘भारतगीते गाऊ, घरोघरी शिवराय पाहू’ असे फलक हाती धरून शेळद येथील अनुसूचित जाती विद्यार्थिनींची निवासी शाळा, बाल शिवाजी विद्यालय, श्री शिवाजी विद्यालय, श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय अशा अनेक शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, शेकडो नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते. महाराष्ट्र माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला ‘राजराजेश्वरावर शपथ’ हा देखावा लक्षवेधी ठरला.

ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले.
देसाई क्रीडांगणापासून कापड बाजार, सिटी कोतवाली, शासकीय उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पदयात्रेचा मार्ग होता. जिल्हाधिकारी कार्यालय येथे वृक्षारोपण करून यात्रेचा समारोप करण्यात आला. जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे रक्तदान महाशिबिराचेही आयोजन करण्यात आले.
