अकोला दिव्य न्यूज : Mahashivratri 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: संपूर्ण देशात उद्या बुधवार २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. लाखो भाविक शिव मंदिरात जाऊन विशेष पूजन, जलाभिषेक, रुद्राभिषेक करतात. शंकराचे नामस्मरण, उपासना, मंत्रांचा जप केला जातो. शंकर महायोगी, अतुल पराक्रमी असूनही त्यागी, विरागी असा आहे. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. महाशिवरात्रीला लाखो घरांमध्ये शिव पूजन केले जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने शिवपूजन कसे करावे? कोणत्या मुहुर्तांवर शिवपूजन करणे पुण्यफलदायी ठरू शकते? जाणून घेऊया…

महाशिवरात्रीचे व्रत कोणालाही करता येते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळते. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

काही ठिकाणी महाशिवरात्रीला महादेवांसह गणपती, कार्तिकेय, पार्वती देवी यांचे पूजन केले जाते. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेलपत्र आवर्जून वाहिले जाते. रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते.

महाशिवरात्रीचे शुभ मुहूर्त : नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत. पैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. रात्रीच्या ४ प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी ४ प्रहर पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.

पहिला सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून २५ पर्यंत असेल. दुसरा रात्री ९ वाजून २६ मिनिटांपासून वाजता सुरू होईल. रात्री १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असेल. तिसरा प्रहर मध्यरात्री १२ वाजून ३५ मिनिटांपासून ते उत्तररात्रो ३ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असेल. चौथा आणि शेवटचा प्रहर २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ३ वाजून ४१ मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असेल. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ०८ मिनिटांनी माघ वद्य चतुर्दशी सुरू होत आहे. तर २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ०८ वाजून ५४ मिनिटांनी चतुर्दशीची सांगता होत आहे.
अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. परंतु, महाशिवरात्री व्रतात निशीथकालाला महत्त्व असून, या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते. त्यामुळे २६ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री शिवपूजन करावे. महाशिवरात्रीला सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला निशीथकाल रात्री १२ वाजून २७ मिनिटांपासून ते ०१ वाजून १६ मिनिटांपर्यंत असेल.

महाशिवरात्री पूजा विधी
या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून घरातील पूजेच्या ठिकाणी घरातील शिवावर पाणी आणि पंचामृताने अभिषेक करावा.
त्यानंतर अक्षता, पान, सुपारी, चंदन, लवंग, वेलची, भस्म, धतुरा, बेलपत्र, कमलगट्टा, सफेद फूल इत्यादी देवाला अर्पण करावे.
शिव लिंगासमोर धूप, दीप लावून आरती करून घ्यावी.
त्यानंतर महादेवाच्या स्तोत्रांचे आणि मंत्राचे पठण करावे.

महाशिवरात्रीचा शिवपूजन विधी : महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. भगवान शंकराचे ध्यान करावे. सकाळी संध्यादी विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावावा. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी. हातात पाणी घेऊन `शिवरात्रिव्रतं ह्येतत्करिष्येऽहं महा”ध्यायेनित्यं
महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसम् ।
रत्नाकल्पोज्वलांगं परशुमृगवरा भीतीहस्तं प्रसन्नम् ।।
पद्मासीनं समन्तात्सु तममरगणैव्याघ्रकृत्तिं वसानम्।
विश्वाद्यं विश्ववंद्यम् निखिलभयहरं पन्चवक्त्रं त्रिनेत्रम् ।।

शंकराला पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. ऋतुकालोद्भव सुगंधी फुले, बेलाची पाने, धोतऱ्याची फुले, धूप, दीप यांनी अर्पण करून मनोभावे पूजा करावी. नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावे आणि आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवाची करुणा भाकावी. वरीलप्रमाणे सर्व उपचार झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करावा. ॐ शिवाय नमः या मूलमंत्राचा १०८ वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने, तसेच मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य नसल्यास शक्यतो घरीच यथासांग पूजा करावी.

निशीथकाळी केले जाणारे शिवपूजन : महाशिवरात्रीदिनी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निशीथकालात यशाशक्ती शिवपूजा करावयाच्या असतात. पहिल्या प्रहरात पूजा करताना ‘श्रीशिवाय नमः’ असा नामोच्चार करावा. दुसऱ्या प्रहरात पूजा करताना ‘श्रीशंकराय नमः’ असे म्हणावे. निशीथकाली पूजा करताना ‘श्रीसांबसदाशिवाय नमः’ असे जपावे. तिसऱ्या प्रहरात करताना ‘श्रीमहेश्वराय नमः’ आणि चौथ्या प्रहरात पूजा करताना ‘श्रीरुद्राय नमः’ असा नामोच्चार करून समर्पण करावे, असे सांगितले जाते. शंकर ही देवता सर्वप्रकारच्या लोकांना आकर्षित करणारी आहे. शंकर हा महायोगी, अतुल पराक्रमी असूनही त्यागी आणि विरागी वृत्तीचा आहे. तो स्मशानात राहतो. तो रुद्र आहे. उग्र आहे, तरीही मुनिजन सुखकारी आहे. तो भोळा आहे. आशुतोष म्हणजे लवकर प्रसन्न होणारा आहे. तो भक्तांची इच्छा पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे. प्रत्येकाने आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून महाशिवरात्रीला शिवपूजन करावे, असे सांगितले जाते.

॥ हर हर महादेव ॥
mahashivratri-2025-shubh-muhurat-and-vrat-puja-vidhi-of-mahadev-lord-shiva