अकोला दिव्य न्युज ब्युरो : मी काही बोललो तर अनेकांना वाटते २ समाजात तेढ निर्माण करतोय. अरे बाबांनो, त्यांच्या १५-२० सभा झाल्यावर आमची सभा होतेय. आम्ही काही बोललो नाही. माझा खुटा उपटायला मी तुझे काय केले? फोनवरून शिव्या, मेसेज देतायेत. मला आलेल्या शिव्या गलिच्छ भाषेत आहेत. तुमची हिंमत असेल तर वाचा, सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या असं मी पत्रकारांना म्हटलं. मी आणि माझे कुटुंब गेली २ महिने या शिव्या वाचतोय, ऐकतोय आम्ही कसं जगायचे? मी कुठे दगड मारला, टायर जाळला आम्ही काही केले नाही. ते जाळतायेत, घरदारे पेटवली त्यांना सांगा. पेटवायला अक्कल लागत नाही तर बनवायला अक्कल लागते अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली.
ना. भुजबळ म्हणाले की, माझी सर्वपक्षातील नेत्यांना विनंती आहे. अधिकाराच्या लढाईत निमंत्रण पाठवली जात नाही. त्याचा आत्मा जिवंत आहे ते स्वत:समर्थनात येतात. आपल्या अधिकारावर गदा येत असेल तर विरोध करायला हवा. नवीन निर्माण नेते आता बोलतंय, भुजबळ म्हातारा झालंय, सगळेच होणार आहेत. आमचे केस एका आंदोलनाने पिकले नाहीत. जितके केस तितकी आंदोलने छगन भुजबळांनी केलीय. आंदोलन मला नवीन नाही. दोन्ही बाजूने तुम्ही आम्हाला अडचणी आणतायेत. एकाबाजूला कुणबी दाखले द्या, तर दुसरीकडे बाळासाहेब सराटे हायकोर्टात जाऊन ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केलीय असं त्यांनी सांगितले.
तसेच ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. सरकारी नोकरीत आकडेवारीनुसार, १ लाख ३० हजार जागांचा अनुशेष आहे. १० टक्के आरक्षण आर्थिक निकषावर आहे. त्यात कोण तर मराठा समाज, उरलेल्या ४० टक्क्यात मराठा समाज आणि आता आमच्या २७ टक्के आरक्षणातही मराठा समाज येतोय असं भुजबळांनी म्हटलं.
दरम्यान, मराठा समाज १५ टक्के आयएएस, आयपीएस २८ टक्के, फॉरेन सर्व्हिस १८ टक्के, मंत्रालयात अ – ३७.५ टक्के, ब – ५२.५ टक्के, क – ५२ टक्के आणि ड -५५ टक्के लोक आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाने ५१०५ कोटी रुपये वितरीत केले. १० टक्के आर्थिक निकषावर आरक्षण आहे त्यात वेगवेगळ्या अभ्यासक्रमात ७८ टक्के मराठा समाज आहे. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती २ लाख १३ हजार लाभार्थी आहेत. सारथी, मराठा महामंडळाला जे दिले ते महाज्योती आणि ओबीसी महामंडळाला द्या अशी मागणी छगन भुजबळांनी केली.
आज आमची लायकी काढली जाते
आमची लायकी काढतो, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याकडे लायकी होती म्हणून स्वराज्यासाठी लढले. महात्मा फुलेंची लायकी होती त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली. शिवजयंती फुलेंनी सुरू केली. शाहीर अमर शेख यांनी दुसरा पोवाडा रचला, अण्णाभाऊ साठे यांनी तिसरा पोवाडा रचला. जे संविधान आम्ही मानतो, जे बाबासाहेब आंबेडकर दलीत समाजाचे, त्यांची लायकी नव्हती…कुणाची लायकी काढताय ? पेशवाईला लोळवणारे महार सैनिक यांच्याकडेही लायकी होती. कपडे आमचा शिंपी शिवतो, तुमची शेतीची अवजारे सुतार बनवतो. वडार दगडावर घाव घालून पाटा वरवंटा तयार करतो, चप्पला चर्मकार बांधवांनी बांधली, घर बलुतेदारांनी बांधली आमची लायकी नाही? आज आमची लायकी काढली जाते अशा शब्दात भुजबळांनी जरांगे पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.