गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : करोनाकाळात अकोल्यात लावण्यात आलेले पीएसए तंत्रज्ञानावर दोन्ही ऑक्सिजन प्लॅंट मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने, ऑक्सिजन निर्मिती संयंत्र निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. करोना संकट ओसरल्यानंतर जाणीवपूर्वक मॉक ड्रिलकरुन या प्लॅंटची उपयोगिता कायम राखण्याचा प्रयत्न केला गेला नाही. आता त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले असून भविष्यात ही संयंत्रे भंगारात काढण्याचा प्रयत्न होईल. यात शंका नाही. विशेष म्हणजे पीएम केअर्स फंडातून अकोला वैद्यकीय महाविद्यालयात आलेले शेकडो व्हॉंटिलेटरही निकामी झाले आहेत.अनेक घोटाळे उघडकीस येत असल्याने ऑक्सिजन प्लॉंट, व्हेंटिलेटर, हातमोजे आणि उपचारासाठी खरेदी केलेल्या औषधी व साधनसामग्रीचे ऑडिट होणं गरजेचं आहे.
संग्रहित छायाचित्र
करोनाकाळात लोकांचा जीव वाचवण्यासाठी देशभरासह अकोला शहरात देखील ऑक्सीजन प्लॅट लावण्यात आले. मात्र काही महिन्यातच करोनाचा उद्रेक ओसरला आणि दोन्ही ऑक्सिजन प्लॅंटची गरज संपली. पण पीएसए (प्रेशर स्विंग अॅबसॉर्पशन) तंत्रज्ञानावर आधारित या प्लॅट्सचे आयुष्य १० वर्षांचे आहे. त्यांचा वापर झाला नाही तर ते लवकरच भंगार होतील. हे माहिती असतानाही ऑक्सिजन प्लॅटची निर्मिती क्षमता कायम राखण्याचा प्रयत्न केला नाही.
विशेष म्हणजे आठवड्यात, पंधरवड्यात किंवा महिन्यातून एकदाही मॉक ड्रिलसाठी हे प्लॅंट सुरू केले नाही. तर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मॉक ड्रिल पुरेशी नाही. हे प्लॅट सुरू ठेवावे व उत्पादन करत राहावे लागेल तरच ते चांगले राहू शकतील. दोन्ही प्लॅंट आमदार फंडातून लावण्यात आला असून याची १० वर्षे वॉरंटी आहे. मात्र त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
करोनाकाळात अकोलासह देशभरात कोट्यावधी रुपयांचा खर्च करून सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लॅंटमधून केंद्र आणि राज्य सरकारे सार्वजनिक आरोग्य केंद्रे, खासगी क्लीनिक आदी छोट्या रुग्णालयांसाठी ऑक्सीजनचे उत्पादन करून पीएसए प्लॅंट वाचवू शकतात. यासाठी त्यांना एक उपकरण स्थापित करण्यासाठी केवळ २५ लाख रुपये गुंतवून याद्वारे उत्पादीत ऑक्सीजन गॅस सिलिंडरमध्ये साठवता येईल.मात्र का आणि कसासाठी या मानसिकतेतून बाहेर पडले तरचं हे शक्य होईल.