अकोला दिव्य न्युज ब्युरो : मराठी सिनेसृष्टीतील गाजलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी. या दोघांनी जेव्हा जेव्हा सिनेमा केला तो हिटच झाला. ‘खबरदार’, ‘झपाटलेला’, ‘धडाकेबाज’, ‘धुमधडाका’ अशा अनेक सिनेमांचा यात समावेश आहे. महेश कोठारेंनी कायम आपल्या सिनेमांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक प्रयोग केले. आता त्यांना AI चा वापर करुन पुन्हा लक्ष्मीकांत बेर्डेंना स्क्रीनवर आणायचंय अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
नुकतंच महाएमटीबीला दिलेल्या मुलाखतीत महेश कोठारे म्हणाले, “लक्ष्या माझा जीवलग मित्र होता आणि अजूनही आहे. तो आजही माझ्याबरोबर आहे आणि मला तो मार्गदर्शन करतो तो माझ्याबरोबर आहे असं मला वाटतं. लक्ष्मीकांतने खूप सिनेमे केले पण त्यात लक्षात राहणारे जे चित्रपट आहेत ते माझ्यासोबतच होते. त्यामुळे आमचं गणितच वेगळं होतं. धुमधडाका, थरथराट, झपाटलेला, पछाडलेला असे बरेच होते. पछाडलेला सिनेमा त्याचा शेवटचा ठरला आणि त्याचवर्षी तो गेला.
ते पुढे म्हणाले, “मला लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर पुन्हा काम करायची इच्छा आहे. AI चा उपयोग करुन मला लक्ष्मीकांतला रिक्रिएट करायचंय आणि ते मी करणारच. लक्ष्मीकांतला मी स्क्रीनवर आणणार आहे. महेश-लक्ष्या पुन्हा एकत्र दिसणार. महेश कोठारेंचं आत्मचरित्र डॅमइट आणि बरंच काही यामध्ये त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक किस्से, लक्ष्यासोबतच्या मैत्रीबद्दल बरंच लिहिलं आहे. आता त्यांचा आगामी ‘झपाटलेला 3’ प्रदर्शित होणार आहे.