Sunday, June 16, 2024
Homeगुन्हेगारीAkola Crime : उद्योजक भरतीया यांच्याकडे धाडसी चोरी !महागडे दाग-दागिने आणि रोख...

Akola Crime : उद्योजक भरतीया यांच्याकडे धाडसी चोरी !महागडे दाग-दागिने आणि रोख रक्कमेसह 2 कोटीचा ऐवज लंपास

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरातील गौरक्षण संस्थान लगतच असलेल्या उद्योजक ब्रिजमोहन भरतीया यांच्या बंगल्यात प्रवेश करुन अज्ञात व्यक्तींनी महागडे दाग-दागिने, चांदी व चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कमेसह 2 कोटी रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली. वृत्त लिहिस्तोवर चोरट्यांचा सुगावा लागला नाही. चोरी काल शुक्रवारी मध्यरात्री नंतर झाली असून, घटनास्थळी पाचारण करण्यात आलेल्या श्वान पथकाकडून जुजबी पुरावा सापडला नाही.सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, खदान पोलिस ठाण्याकडून रात्रीला घातल्या जात असलेल्या गस्तीवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरक्षण संस्थान लगतच ब्रिजमोहन भरतीया यांचा बंगला असून, बंगल्यात सुरक्षिततेसाठी सर्व उपाय योजना केलेल्या असताना जबरी चोरी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघड आली व एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, आणि अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ञांना बोलावण्यात आले. तर श्वान पथकाकडून जुजबी पुरावा किंवा दिशा सापडली नाही.

बंगल्याच्या मागील बाजूस शिडी व दागिन्यांचें खाली बॉक्स मिळाले आहेत. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यातून चोरट्यांच्या संभाव्य हालचालींचा आणि ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने, चांदीचे मुद्देमाल, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. चोरीत जवळपास 2 कोटी रुपयांचा माल लंपास झाला आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

शहरातील श्रीमंत परिसरांपैकी एक मानला जाणारा गौरक्षण रोड अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांनी कुख्यात झाला आहे. शहरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने खदान पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!