Saturday, July 20, 2024
Homeराष्ट्रीयमग, तेव्हा ओरडून नका ! लक्षात ठेवा कार्यक्रम : मतदार याद्या तपासून...

मग, तेव्हा ओरडून नका ! लक्षात ठेवा कार्यक्रम : मतदार याद्या तपासून घ्या ; नावाची नोंदणी करा

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : अलिकडच्या महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ‘मतदार यादी’ मध्ये नावच नाही. मागच्या निवडणुकीच्या वेळी होते. सगळा भोंगळ कारभार सुरू आहे. मुद्दामहून नांव वगळले, असे एक ना अनेक दोषारोपण करुन हजारो मतदारांनी निवडणूक विभागाच्या नावाने शिमगा केला. आता पुढच्या काळात राज्याच्या विधानसभेची निवडणुक जाहीर करण्यात येणार असून, त्यादृष्टीने अकोला जिल्ह्यात 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावरील मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.तेव्हा न चुकता त्या मतदारांनी आपले नाव तपासून पाहिले पाहिजे की, ज्यांचे नाव लोकसभा निवडणुकीत नव्हते. या सोबतच 1 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या सर्व नागरिकांनी सर्व कामे बाजूला ठेवून आणि ठरवून मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी. कोणतीही पात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यापासून वंचित राहू नये.याची खबरदारी प्रत्येक सुजाण मतदार/ नागरिकांनी घ्यावी. उगीच मतदानाच्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागू नये, म्हणून…. लक्षात ठेवा असा आहे कार्यक्रम
निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. पुनरीक्षण पूर्व उपक्रमात मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी प्रत्‍यक्ष घरोघरी भेट देऊन 25 जून ते 24 जुलैदरम्यान पडताळणी करणार आहेत. त्यात मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदार यादी, ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे व आयोगाच्‍या मानकानुसार छायाचित्र प्राप्‍त करुन मतदार यादीत सुधारणा करणे, तसेच अस्‍पष्‍ट छायाचित्र बदलणे, केंद्राच्‍या यादीस मान्‍यता घेणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे, नमुना 1 ते 8 तयार करणे आदी कामे केली जातील.

हे सगळं सोपस्कार पूर्ण करून झाल्यावर एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी 25 जुलै रोजी सर्व उपविभागीय (SDO) कार्यालय तहसील कार्यालये येथे प्रसिद्ध केली जाईल. मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांकडे देखील ही यादी उपलब्ध असेल. त्यानंतर 9 ऑगस्ट 2024 पर्यंत दावे व हरकती स्विकारण्‍यात येतील. या कालावधीत शनिवार व रविवारी विशेष मोहिमही राबवल्या जातील. त्यानंतर 19 ऑगस्टपूर्वी दावे व हरकती निकालात काढल्या जातील आणि अंतिम मतदार यादी 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल.

प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर सदर यादीची तपासणी करुन सर्व मतदारांनी आपली नांवे मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत व त्यातील तपशील योग्य असल्याबाबत खात्री करावी. दि. 1 जुलै 2024 रोजी वा त्यापुर्वी वयाची 18 वर्षे पुर्ण होणा-या तसेच ज्या मतदारांची नांवे मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत अशा पात्र व्यक्तींनी आपले नांव नोंदविण्यासाठी संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदार नोंदणी अधिकारी/मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे आवश्यक पुराव्यांसह विहीत नमुना 6 सादर करावा अथवा भारत निवडणूक आयोगाकडून विकसित करण्यात आलेल्या voters.eci.gov.in या संकेत स्थळाचा / voter helpline या App चा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वापर करावा. विहित नमुने जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे उपलब्ध करुन दिले आहेत.
त्याचप्रमाणे, मयत किंवा कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नांवे वगळणी करणेकरीता विहीत नमुना 7 आवश्यक कागदपत्रांसह भरुन द्यावा, मतदारांच्या मतदार यादीमधील तपशीलामध्ये दुरुस्ती करणे, पत्ता बदलणे, नवीन मतदार छायाचित्र ओळखपत्र मिळविणे इत्यादी साठी आवश्यक पुराव्यांसह विहीत नमुना 8 मध्ये अर्ज संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी / सहायक मतदार नोंदणी अधिकारी/ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करता येईल.
ज्या मतदारांना त्यांच्या मतदार यादीमधील नोंदीशी त्यांचा आधार क्रमांक स्वयंस्फूर्तीने संलग्न करावायाचा आहे, त्यांनी विहित नमुना क्र. 6 किंवा 8 भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा तहसिलदार कार्यालयात सादर करावा, असे आवाहनही अकोला जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी देखील केले आहे.

Oplus_131072
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!